प्रतिनिधी(प्रताप भणगे) : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवडे व डफळवाडी गावांमध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा संघर्ष उफाळून आला आहे. काही वर्षांपूर्वी तारळे धरण प्रकल्पासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने हस्तगत केल्या. त्यानंतर खाजगी पवनऊर्जा प्रकल्पासाठी अनेकांच्या जमिनी कवडीमोल भावाने खरेदी करण्यात आल्या. आता उरलेल्या काही जमिनी बॉक्साईट आरक्षणाखाली आल्याने शेतकऱ्यांच्या नावावर असल्या तरी प्रत्यक्ष वापरात नाहीत.
याच पार्श्वभूमीवर आता ग्रीन एनर्जी प्रकल्पाच्या नावाखाली आदानी कंपनीचे आगमन गावकऱ्यांच्या चिंतेत भर टाकत आहे. ग्रामस्थ मंडळ डफळवाडी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासनातील काही वरिष्ठ अधिकारी आणि स्थानिक दलाल यांच्या माध्यमातून उरलेल्या जमिनी खाजगी कंपनीने पुन्हा कमी किंमतीत विकत घेतल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहेत.
गावकऱ्यांचा आरोप आहे की, आदानी ग्रीन एनर्जी प्रकल्पाचे काम गावकऱ्यांना कोणतीही पूर्वकल्पना किंवा परवानगी न देता सुरु करण्यात आले आहे. “विंडस्टार” या दलाल कंपनीमार्फत लोकांची फसवणूक करून त्यांना विविध आमिषे दाखवण्यात आली, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेने प्रकल्पाला नकार दिलेला असतानाही काम राजरोस सुरू आहे.
सदर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर उत्खनन आणि ब्लास्टिंग सुरू असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले आहे. ग्रामसभा घेऊन गावकऱ्यांनी स्पष्टपणे ब्लास्टिंग परवानगी नाकारली असतानाही, प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांकडून या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जातो.
दरम्यान, सातारा जिल्हाधिकारी
यांनी 9 ऑक्टोबर 2025 रोजी या प्रकल्पासाठी ब्लास्टिंगसाठी न हरकत प्रमाणपत्र मिळविण्यासाठी सुनावणीची नोटीस दिली आहे. या अनुषंगाने 17 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे. मात्र, या सुनावणीत नमूद केलेल्या काही जमिनी न्यायप्रविष्ट प्रकरणांत अडकलेल्या आहेत.
डफळवाडी हे गाव डोंगरकपारीवर वसलेले असून भूस्खलनग्रस्त क्षेत्र म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी ब्लास्टिंगचे काम सुरू करणे धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ग्रामस्थांचा प्रश्न आहे —
“प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देणार की खाजगी कंपनीचे भले करणार?
या प्रकरणात जिल्हा प्रशासनाने निष्पक्ष भूमिका घेऊन गावकऱ्यांच्या सुरक्षेला व हक्कांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी निवडे-डफळवाडी येथील ग्रामस्थांनी केली आहे.