मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मोठी घोडदौड सुरू केली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ विभागांच्या संघटनात्मक आढावा बैठकींचे तीन दिवसीय सत्र मुंबईतील जंजीरा बंगल्यावर उत्साहात पार पडले.
शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार १५, १६ आणि १७ ऑक्टोबर २०२५ रोजी अनुक्रमे तीनही विभागांच्या आढावा बैठकांचे आयोजन करण्यात आले. या बैठकींना शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसूळ, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादाजी भुसे, युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच शिवसेना नेत्या मा. सौ. मिनाताई कांबळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत तिन्ही विभागांतील नगरपंचायत व नगरपरिषदांची विद्यमान संघटनात्मक ताकद, स्थानिक परिस्थिती आणि निवडणुकीसाठी आवश्यक रणनीती यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि शहरप्रमुखांना संघटन बळकटीसाठी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
“राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये शिवसेनेचे जास्तीत जास्त नगराध्यक्ष निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत,” अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
युवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या प्रसंगी कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात राबवलेल्या विकास प्रकल्प, शिक्षण, रस्ते, वीज, पाणी, जलसिंचन आणि ‘लाडकी बहीण’ योजना यांसह विविध लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली.
त्यांनी पुढे सांगितले की, “शिवसेनेचे अनुभवी पदाधिकारी आणि ज्येष्ठ शिवसैनिक यांच्या अनुभवातून महिला सेना आणि युवा वर्गाने संघटन बळकटीसाठी पुढाकार घ्यावा. बैठकीच्या अखेरीस उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी ‘शिवसेनेचा भगवा आपल्या विभागात डौलाने फडकविण्याचे’ वचन देत आगामी निवडणुकांसाठी सज्जतेचा निर्धार केला. या बैठकीत शिवसेनेचे अनेक खासदार, आमदार, उपनेते, सचिव, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख तसेच माजी नगरसेवक व पक्ष पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.