कराड (प्रताप भणगे) : कराड शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी ॲड. अमित जाधव यांची निवड करण्यात आली असून, त्यांच्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे. काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि तळागाळातील जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी त्यांची नियुक्ती महत्वपूर्ण आहे.
महाविद्यालयीन काळापासूनच सार्वजनिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतलेले ॲड. जाधव हे गेली एक तपाहून अधिक काळ कराड शहरात काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने करत आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते श्री. पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे नेतृत्व व विचार हे त्यांनी मार्गदर्शक मानले आहेत. पक्ष संघटनेला नवचैतन्य देण्यासाठी त्यांचे कार्य सदैव गतिमान राहिले आहे.
एक अभ्यासू दिवाणी विधीज्ञ म्हणून न्यायालयीन क्षेत्रात त्यांचा विशेष नावलौकिक असून, त्यांनी कायदेविषयक विविध प्रश्नांवर मार्गदर्शनासह लोकजागृती घडवून आणली आहे. सातारा जिल्हा काँग्रेस कायदा आघाडी (लीगल सेल) चे अध्यक्ष म्हणून त्यांनी समाजात, महाविद्यालयांमध्ये आणि विविध संस्थांमध्ये कायदेविषयक जनजागृती मोहिमा यशस्वीरीत्या राबवल्या आहेत.
काँग्रेस पक्ष संक्रमणाच्या काळातून जात असताना, पक्षनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या योगदानाची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत ॲड. अमित जाधव यांच्यासारख्या अभ्यासपूर्ण, नियोजनबद्ध व निष्ठावंत कार्यकर्त्यावर अध्यक्षपदाची धुरा सोपवली गेली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर काँग्रेस कमिटी नवचैतन्याने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.