कराड (प्रताप भणगे): कापिल गावातील बोगस मतदान प्रकरणातील दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई व्हावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार यांनी अनिश्चितकालीन धरणे आंदोलन सुरू केले आहे.
गावातील काही नागरिक आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी काही अधिकारी यांनी मतदानासारख्या पवित्र हक्काशी गद्दारी केली असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. “ही केवळ गुन्हेगारी कृती नाही, तर संविधान आणि लोकशाहीचा अपमान आहे,” असे ते म्हणाले.
या गंभीर प्रकरणात दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी वारंवार करूनही प्रशासन व निवडणूक यंत्रणा मौन बाळगून आहे, ही शांतता म्हणजे निष्काळजीपणा आणि अन्यायाला प्रोत्साहन असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
दिवाळीचा सण जवळ आला असताना सर्वजण आपल्या कुटुंबीयांसोबत सण साजरा करतील, पण “लोकशाहीचा दिवा विझू नये म्हणून मी आंदोलनस्थळीच राहणार आहे,” असा निर्धार गणेश पवार यांनी व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले, “माझं कुटुंब माझी काळजी घेईल, पण मी लोकशाहीच्या रक्षणासाठी घरच्या सुखसोयी, सण आणि भावनांनाही बाजूला ठेवत संविधानाच्या मूल्यांसाठी लढणार आहे.”
दिवाळीदरम्यान आंदोलनाची तीव्रता वाढवण्यासाठी पवार यांनी विविध शांततापूर्ण कार्यक्रमांची आखणी केली आहे —
नरक चतुर्दशी: प्रशासकीय इमारतीसमोर दिवाळीची पहिली आंघोळ करून आंदोलन
लक्ष्मीपूजन: “फराळ आंदोलन” – नागरिक, पत्रकार व समर्थकांसाठी आमंत्रण
दिवाळी पाडवा: अधिकाऱ्यांना सदबुद्धी मिळावी यासाठी मारुती मंदिरासमोर दिवे लावून “प्रार्थना आंदोलन”
भाऊबीज: बहिणींना “भाऊबीज ओवाळणीसाठी आंदोलन स्थळी” निमंत्रण देऊन लोकशाहीसाठी एकजूट दाखवणार
ही सर्व आंदोलने अहिंसक, शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने पार पडणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की, या आंदोलनाची अधिकृत नोंद घेऊन दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
“लोकशाही वाचवण्यासाठी जर नागरिकाला सणासुदीच्या काळात आपल्या कुटुंबापासून दूर राहावे लागत असेल, तर त्याचा अर्थ प्रशासनाने आपली जबाबदारी पार पाडलेली नाही. माझं आंदोलन कुणाविरुद्ध नाही, ते अन्यायाविरुद्ध आहे — आणि संविधानाच्या रक्षणासाठी आहे,” असे गणेश पवार यांनी स्पष्ट केले.