कराड(प्रताप भणगे) : कोळेवाडी- तुळसण–उंडाळे हा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्थेत आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे, विस्कटलेली खडी आणि उखडलेला रस्ता यामुळे या मार्गावरून प्रवास करणे वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे.दररोज या रस्त्यावरून अवजड दगड-खडी वाहून नेणारे डंपर तसेच शेतीसंबंधित ट्रॅक्टर आणि वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे. साखर कारखान्याचा हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतूक लवकरच वाढणार असल्याने अपघातांची शक्यता अधिकच वाढली आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले कोळेवाडी -तुळसण -उंडाळे रस्त्याचे गेल्या वर्षी झालेले बांधकाम निकृष्ट दर्जाचे होते. केवळ अर्धा इंच कार्पेट घातल्याने काही महिन्यांतच रस्ता उखडला. तुळसणखिंडीपासून उंडाळ्यापर्यंत ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, परिसरात अनेक स्टोन क्रशर (दगड खाणी) कार्यरत आहेत. अंदाजे २५ ते ३० डंपर दररोज या मार्गावरून धावत असल्याने रस्त्यावर खडी सांडते आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढते आहे.तुळसण गावातील नवीन पाण्याच्या टाकीजवळ गतिरोधक (स्पीड ब्रेकर) नसल्याने वाहनांचा वेग नियंत्रणात राहत नाही, त्यामुळेही अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.दरम्यान, वन विभागाच्या हद्दीत असलेल्या पुलाजवळील रस्ता मोठ्या प्रमाणात खराब झाला आहे. या भागातील दुरुस्तीला वन विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. “वन विभागाने तातडीने परवानगी न दिल्यास आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल,” असा इशारा सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ माने यांनी दिला आहे.स्थानिक नागरिकांनी सांगितले की, या रस्त्यालगत काही असामाजिक प्रवृत्तीचे लोक मेलेली जनावरे आणि जुने कपडे टाकतात, ज्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. “या प्रकारावर वन विभागाने तातडीने कारवाई करावी,” अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व पत्रकार दिलीप पाटील यांनी केली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग व वन विभाग यांनी या समस्येकडे सामंजस्याने लक्ष देणे अत्यावश्यक असल्याचे नागरिकांचे मत आहे. या रस्त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “जीवितहानी होण्यापूर्वी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.तसेच, रस्त्यावरील दिशादर्शक फलक गायब झाल्याने प्रवाशांना मार्ग शोधण्यात अडचणी येत आहेत. नागरिकांनी हे फलक तातडीने बसवावेत, अशी मागणी केली आहे. नागरिकांची मागणीया संदर्भात ‘आपले सरकार’ या ॲपवर अधिकृत तक्रार नोंदवली असून, संबंधित विभागांनी तत्काळ दखल घेऊन रस्ता दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी अमोल यादव (ग्रामस्थ, तुळसण) यांनी केली आहे.-
कोळेवाडी– तुळसण -उंडाळे रस्त्याची दयनीय अवस्था
RELATED ARTICLES