मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातील नियमित, कंत्राटी तसेच बाह्ययंत्रणेद्वारे महामंडळात प्रशासकीय कामकाज हाताळणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्ताने सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्यात आल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक
कार्य मंत्री आशिष शेलार यांनी गुरुवारी केली.
याबाबत श्री. शेलार यांनी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांना सूचना केली होती. श्रीमती म्हसे पाटील यांनी प्रशासनाला तत्काळ निर्देश देऊन ही बाब सकारात्मकपणे मार्गी लावली आहे. त्यामुळे महामंडळातील नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान १६८०० तसेच ३० हजार दिवाळी भत्ता, कंत्राटी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना १५ हजार रुपये तसेच महामंडळातर्गत कार्यरत असणाऱ्या एन.डी.स्टुडीओ येथील कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळीनिमित्ताने मिळणार आहेत. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यामध्ये आनंदी वातावरण असून सर्वांनी आभार मानले आहेत.
नियमित अधिकारी-कर्मचारी यांच्यासह महामंडळात कार्यरत असणाऱ्या कंत्राटी अधिकारी कर्मचारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी यांचा महामंडळाच्या व्यवसाय विकासात महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने नियमित अधिकारी-कर्मचारी यांना सानुग्रह अनुदानासह इतर कर्मचाऱ्याना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.