मुंबई — सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर भर न्यायालयात जोडा फेकण्याचा संतापजनक प्रयत्न गेल्या ६ ऑक्टोबर रोजी घडला.या जोडा फेक प्रकरणातील आरोपी वकिल राकेश किशोर तिवारी याला अटक करुन त्याच्यावर कडक कारवाई करा, संपूर्ण जोडफेकीमागे असलेले षडयंत्र केंद्र सरकारने उघड करावे या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी राष्ट्रीय चर्मकार संघाने आपला मोर्चा वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला.हा मोर्चा राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता.
नही चलेगी नही चलेगी दादागिरी नही चलेगी,जोडा फेकणारे किशोर तिवारीस अटक करा,डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो आदी घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकताच तेथे बॅरेकेड लावून हा मोर्चा खेरवाडी पोलिसांनी अडविला.
सुप्रीम कोर्टात वयोवृद्ध वकिल किशोर तिवारी यांनी सरन्यायाधीशायांच्या दिशेने जोडा फेकण्याचा प्रयत्न केला.या घटनेचे सत्य बाहेर येण्यासाठी या घडामोडीचा सुप्रीम कोर्टातील व्हिडीओ केंद्र सरकारने जारी करावा,तसेच राकेश किशोर तिवारीस जोडा फेकण्यासाठी आरएसएस, भाजप की अन्य कोणत्या संघटनेने प्रोत्साहन दिले ?याचा शोध घ्यावा.तसेच बूट फेकीच्या हल्ल्या अगोदर वकिल राकेश किशोर तिवारीस कोण कोण भेटले,त्याला हल्ल्या पूर्वी कोणी कोणी फोन केले याची चौकशी करण्यात यावी अशी जोरदार मागणी बाबुराव माने यांनी या मोर्चानंतर झालेल्या सभेत बोलताना केली.आपल्या बुध्दीमत्तेच्या जोरदार भूषण गवई साहेब हे सरन्यायाधीश झाले. याच रास्त अभिमान चर्मकार समाजाला आहे.परंतु काही धर्मांध लोक अशा घटना घडवून आणून आपल्या सरन्यायाधीशायांची बदनामी करीत आहे अशी टीका बाबुराव माने यांनी केली.काही मनुवाद्यांना अजुनही वाटते की मागासवर्गीय समाजातील लोकांनी आपले नोकर राहावे,आपल्या चपला शिवाव्यात.पण समतेच्या या राज्यात प्रत्येकास समान अधिकार आहेत,असे माने यांनी सांगितले.
राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबईचे माजी अध्यक्ष जगन्नाथ खाडे,विद्यमान अध्यक्ष विलास गोरेगांवकर, मुंबई महिला अध्यक्षा शारदाताई नवले,मुंबई उपनगर अध्यक्ष अशोक देहेरे, दिलीप शिंदे,गणेश खिलारी,अमर शिंदे,राजीव सूर्यवंशी,धामापूरकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयात खटका उडाला
राष्ट्रीय चर्मकार संघाचे अध्यक्ष बाबुराव माने हे आपल्या कार्यकर्त्यांसह उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यासाठी गेले तेंव्हा जिल्हाधिकाऱ्या ऐवजी उपजिल्हाधिकारी निवेदन स्वीकारण्यास आले.तेंव्हा बाबुराव माने यांच्यासह त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते संतप्त झाले.येथे कार्यालयात जिल्हाधिकारी हजर आहेत.यामुळे सरन्यायाधीशायांवरील हल्ल्याबाबतचे चर्मकार समाजाचे निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारीच आले पाहिजेत.चर्मकार समाजाचा सन्मान राखला पाहिजे,असा आवाज बाबुराव माने यांनी दिला.यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात खळबळ उडाली. कार्यकर्ते मागे हटण्यास तयार नाहीत हे दिसताच जिल्हाधिकारी स्वतः बाहेर आले आणि त्यांनी राष्ट्रीय चर्मकार संघाचे निवेदन बाबुराव माने यांच्याकडून स्विकारले.शिवाय भूषण गवई यांच्यावरील हल्ल्या बाबतच्या चर्मकार समाजाच्या भावना या केंद्र व राज्य सरकारला कळविल्या जातील असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.यानंतर बाबुराव माने यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचा राग शांत झाला.