मुंबई — बेस्ट उपक्रमात ८.३३ टक्के आणि अदानी इलेक्ट्रीक सिटी मुंबई कंपनीतील
कर्मचाऱ्यांना २० टक्के दिवाळी बोनस द्या
अन्यथा ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे,असा स्पष्ट इशारा मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे. या वाढीव बोनसच्या मागणीवर बेस्ट, अदानी कंपनीतील कर्मचारी ठाम असून कर्मचाऱ्यांच्या या मागणीवर चर्चा करण्यासाठी आमच्या युनियनच्या व्यवस्थापकीय सभासदांची उद्याच बुधवारी सायंकाळी एक विशेष बैठक सांताक्रूझ पूर्व येथे युनियन कार्यलयात होत असून याच बैठकीत बोनससाठी आंदोलन करण्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.हे आंदोलन खरोखरच झालेच तर मुंबई आणि उपनगरातील वीज पुरवठ्यावर परिणाम होईल.परिणामत: दोन्ही ठिकाणी ऐन दिवाळीत अंधार पसरेल,अशी भिती व्यक्त होत आहे.
बेस्ट उपक्रमाच्या परिवहन,अभियांत्रिकी,सामान्य प्रशासकीय विभाग व विज पुरवठा विभागातील स्थायी कामगारांची १५ हजार रिक्त पदे आहेत.ही पदे भरली नाहीत.आणि दुसरीकडे रिक्त पदांवर कामगारांना पद्दोन्नती दिली नाही. तसेच कायम पदावर असलेल्या हंगामी,कॅज्युअल कामगारांना कायम केले नाही.या माध्यमातून बेस्ट उपक्रमाने कोट्यावधी रुपयांची बचत केली आहे,याकडे विठ्ठलराव गायकवाड यांनी लक्ष वेधले आहे.बेस्ट उपक्रमात पाॅवर लाॅस सहा टक्क्यांनी कमी करण्यात कामगार अधिकाऱ्यांनी यश मिळविले आहे,असेही गायकवाड यांनी सांगितले.
*बेस्टने ८.३३टक्के बोनस द्यावा कोर्टाचा आदेश*
बेस्ट उपक्रमात कामगार कर्मचाऱ्यांचा वेतन करार हा १ एप्रिल १९१६ पासून प्रलंबित आहे.याशिवाय बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के दराने दिवाळी बोनस देण्यात यावा,असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार बोनस वाटप केले नाही तर बेस्ट उपक्रमातील कामगार कर्मचाऱ्यांचे ऐन दिवाळीत आंदोलन अटळ आहे,असा इशारा विठ्ठलराव गायकवाड यांनी दिला आहे.
*अदानी कंपनीने २० टक्के बोनस द्यावाच*
अदानी इलेक्ट्रीकसिटी मुंबई कंपनी आस्थापना विभागातील स्थायी कामगारांची तीन हजार पदे रिक्त आहेत.या पदांवर कामगारांना पदोन्नती दिली गेलेली नाही.तसेच कंत्राटी कामगारांना टप्प्या टप्प्याने कायम पदावर सामावून घेतलेले नाही.त्यामुळे कोट्यावधी रुपयांची बचत अदानी कंपनीने केलेली आहे.शिवाय या कंपनीचे वेतनवाढीचे दोन करार न्यायालयात प्रलंबित आहेत.तसेच अदानी कंपनीस प्रत्येक वर्षी सरासरी दोन हजार कोटी रुपयांचा फायदा होत आहे.त्यामुळे स्थायी व कंत्राटी कामगारांना २० टक्के दिवाळी बोनस देण्यात यावा.ही आमच्या युनियनची मागणी आहे.या मागणीबाबत कंपनी मूग गिळून बसली आहे.याबाबत अदानी कंपनीने काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही.म्हणून अदानी इलेक्ट्रीकसिटी मुंबई कंपनीतील कामगारही आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे विठ्ठलराव गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.