सातारा(DDM News) : सातारा जिल्ह्यातील सासपडे (ता. सातारा) येथे घडलेल्या अल्पवयीन शालेय मुलीच्या निर्घृण खुनाचा तपास अवघ्या २४ तासांत उघडकीस आणत स्थानिक गुन्हे शाखा सातारा आणि बोरगाव पोलिस ठाण्याच्या पथकाने संशयित आरोपी राहुल बबन यादव (वय ३४, व्यवसाय – मजूर, रा. सासपडे) याला अटक करण्यात यश मिळवले आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. १० ऑक्टोबर रोजी दुपारी सासपडे गावात एका अल्पवयीन मुलीचा तिच्याच घरात घुसून अज्ञात व्यक्तीने डोक्यात प्राणघातक वार करून खून केला होता. या प्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली.
घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्याने तपास अधिक आव्हानात्मक ठरला. तरीदेखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू ठेवला. अखेर ११ ऑक्टोबर रोजी आरोपी सासपडे–नागठाणे मार्गावरील टेकडी परिसरात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली.
यानंतर पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तत्काळ छापा टाकून आरोपीला अटक केली. प्राथमिक चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. कोणतेही ठोस पुरावे नसतानाही पोलिसांनी केवळ गुप्त माहिती आणि चौकशीतून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे हा गंभीर गुन्हा उघडकीस आणला.
तपास पथकाचा सहभाग
या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, परितोष दातीर तसेच पोलिस अंमलदार संतोष सपकाळ, मंगेश महाडिक, अमोल माने, अजित कर्णे, जयवंत खांडके, पंकज बेसके, शिवाजी भिसे, स्वप्निल दौंड, रविराज वर्णेकर आणि संभाजी साळुंखे यांनी मोलाचे योगदान दिले.
तसेच बोरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये निलेश गायकवाड, प्रशांत चव्हाण, मोहन चव्हाण, सतीश पवार, विशाल जाधव, समाधान जाधव आणि महिला अंमलदार नम्रता जाधव यांचाही तपासात सक्रिय सहभाग होता.
वरिष्ठांचा गौरव
या यशस्वी तपासाबद्दल पोलिस अधीक्षक तुषार दोशी आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सर्व अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करत त्यांच्या तत्परतेचे व दक्षतेचे कौतुक केले आहे.
📍 DDM News सातारा
अधिकृत, अचूक आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी – www.ddmnews.in