बुलढाणा – देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात बूट फेकून हल्ला केला. गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वोच न्यायालयात वकिली करणाऱ्या राकेश किशोर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वकिलानेच हे कृत्य केले. त्याच्या या कृत्यानंतर संपूर्ण देशामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे, सरन्यायाधीश पद हे संविधानिक दृष्ट्या सर्वोच्च आणि सन्माननीय आहे. असे असताना त्याने या पदावर बसलेल्या न्यायमूर्तीकडे बुट भिरकावून हल्ला केल्याने या वकिलावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भीम आर्मीचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना एका पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रात नमूद केल्याप्रमाणे. सरन्यायाधीश यांच्यावर हल्ला करणाऱ्या अँड. राकेश किशोर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे तथा हल्ला झाला त्या दिवसाला म्हणजेच 6 ऑक्टोबर या दिवसाला न्यायव्यवस्थेतील काळा दिवस म्हणून जाहीर करा. जनमानसामध्ये संविधानाप्रती जागृती व आदर असावा यासाठी देशातील प्रत्येक न्यायालयाच्या प्रांगणामध्ये हातामध्ये संविधान असलेला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात यावा. प्रत्येक न्यायालयातील न्यायाधीशांना मजबूत सुरक्षा देण्यात यावी .या सह इतर महत्त्वाच्या मागण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे धडकणार आहे. त्यांनी केलेला हल्ला हा केवळ एका व्यक्तीवर नसून तो या देशाच्या संविधानावर व संविधान द्वारा स्थापित न्यायव्यवस्थेवर आहे. हे कृत्य अतिशय निंदनीय व अत्यंत कठोर शिक्षेस पात्र आहे. संबंधित घटनेमुळे देशातील सुरक्षा व्यवस्थेवर देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यासाठी सदर घटनेस जबाबदार असलेल्या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ फाशी देण्यात यावी. जेणेकरून अशा घटना भविष्यात पुन्हा होणार नाहीत व न्यायालयाची गरिमा कायम राहील.
ज्या देशामध्ये सरन्यायाधीश सुरक्षित नाही त्या देशांमध्ये आम माणसाचे काय हाल असतील असे देखील या पत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे. देशामध्ये सरकारच्या पक्षपाती धोरणामुळे अराजकता निर्माण होत असल्यास सर्वसामान्य जागरूक माणसाने आपले अधिकार आणि संविधानाच्या संरक्षणासाठी कायदेशीर मार्गाने रस्त्यावर उतरावे लागेल.
वरील नमूद मागण्यासाठी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा येथे सतीश दादा पवार यांच्या नेतृत्वात भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी बहुजन समाज बांधवांनी पक्ष संघटना तथा गटातटाच्या मर्यादा ओलांडून संविधानाच्या रक्षणासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.