मुंबई, दादर : कबुतरखान्याच्या वादातून झालेल्या कबुतरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्मशांतीसाठी शनिवारी दादर येथे जैन समाजाकडून भव्य धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. या धर्मसभेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मोठी घोषणा करत सांगितले की, “जन कल्याण पार्टी” नावाचा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्यात येणार आहे.
मुनी विजय म्हणाले, “कांद्यामुळे काँग्रेसचे सरकार पडले, कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार पडले, आणि आता कबुतरांमुळे महायुतीचे सरकार पडेल.” त्यांच्या या वक्तव्याने संपूर्ण सभेत जल्लोष झाला.
या धर्मसभेला जैन इंटरनॅशनल सेवा ऑर्गनायझेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पुनमिया आणि अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. मुनी निलेशचंद्र विजय पुढे म्हणाले, “आम्ही सर्व महापालिकांमध्ये आमचे उमेदवार उभे करू. शिवसेनेकडे वाघ चिन्ह होते, आम्हाला कबुतरांची पार्टी हवी आहे. ही फक्त जैनांची नव्हे, तर गुजराती, मारवाडी आणि सर्व समाज घटकांना सामावून घेणारी पार्टी असेल. आमच्या जन कल्याण पार्टीत फादर सोडून सर्वांना एन्ट्री असेल.”
मुनींनी आपल्या भाषणात पुढे रामायणातील उदाहरण देत सांगितले, “रावणापुढे जटायू पक्षी आला होता. एका पक्षासाठी श्रीरामांनी पुण्य कर्म केले. त्यामुळे रामभूमीत कबुतरांवर अन्याय होऊ नये.”
त्यांनी काही डॉक्टरांवर टीका करत सांगितले, “काही डॉक्टर मूर्ख आहेत. सामान्य माणूस रोज मरतो, सरकार विचार करते का?” असे विचारत त्यांनी सध्याच्या प्रशासनावर थेट प्रहार केला.
दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा धर्मसभेला अनुपस्थित राहिल्याबद्दल मुनींनी नाराजी व्यक्त केली आणि म्हटले, “लोढा आले नाहीत म्हणजे त्यांना कबुतरप्रेम नाही.”
शिवसेना (शिंदे गट) नेत्या मनीषा कायंदे यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना मुनी म्हणाले, “मी कायंदे यांना ओळखत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना शांत करावे; त्या वेड्या आहेत.”
मुंबईच्या राजकीय आणि धार्मिक वर्तुळात या धर्मसभेने नव्या घडामोडींची चर्चा रंगवली असून, ‘कबुतरखान्या’च्या वादातून उदयास आलेली ‘जन कल्याण पार्टी’ ही येत्या निवडणुकांत महत्त्वाची राजकीय नवी शक्ती ठरू शकते, अशी चर्चाही सुरू झाली आहे.