Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रश्री गणेश गौरव पुरस्कार सोहळ्यात डॉ. अमित सैनी यांचे गौरवोद्गार ... ...

श्री गणेश गौरव पुरस्कार सोहळ्यात डॉ. अमित सैनी यांचे गौरवोद्गार … महापालिकेच्या उत्तम नियोजनामुळे श्रीगणेशोत्सव निर्विघ्न पार

मुंबई(नंदू घोलप) – बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे उत्तम नियोजन, श्रीगणेश मंडळांचे समन्वय आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे यंदाचा श्रीगणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, असे गौरवोद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांनी काढले. महापालिकेच्या जनसंपर्क विभागातर्फे आयोजित ‘श्री गणेश गौरव पुरस्कार स्पर्धा – २०२५’ चा पुरस्कार वितरण सोहळा महापालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला उप आयुक्त (विशेष तथा परिमंडळ-१) श्रीमती चंदा जाधव, उप आयुक्त (परिमंडळ-२) तथा गणेशोत्सव समन्वयक श्री. प्रशांत सपकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी परिमंडळनिहाय सर्वोत्तम नैसर्गिक व कृत्रिम गणेशमूर्ती विसर्जन स्थळ स्पर्धेतील विजेत्यांचाही सन्मान करण्यात आला.

डॉ. सैनी म्हणाले, “पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे हा उत्सव अधिक अर्थपूर्ण ठरला. शाडू माती व पर्यावरणपूरक रंग मोफत वाटप, कृत्रिम तलावांची व्यवस्था आणि सर्व गणेश मंडळांचा उत्साह यामुळे हा उत्सव यशस्वी झाला.” त्यांनी सर्व मंडळांचे, अधिकारी-कर्मचार्‍यांचे आणि गणेशभक्तांचे विशेष अभिनंदन केले.

श्री. सपकाळे यांनी सांगितले की, “यंदा १ हजार टन शाडू माती व पर्यावरणपूरक रंग वितरित करण्यात आले. १ हजार मूर्तीकारांना जागा व सुविधा देण्यात आल्या. लोकभावना आणि प्रशासनाचा उत्तम संगम यंदा साधला गेला.”

या स्पर्धेत ६४ सार्वजनिक मंडळांनी सहभाग घेतला. प्रथम पारितोषिक अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्र मंडळाला, द्वितीय पारितोषिक भायखळ्याच्या पंगेरीचाळ मंडळाला आणि तृतीय पारितोषिक विक्रोळीच्या बालमित्र कला मंडळाला मिळाले. शाडू मातीची सर्वोत्तम मूर्तीचा पुरस्कार शिवाजी पार्क (हाऊस) सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला मिळाला.

अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाचे श्री. सुरेश सरनोबत यांनी सर्व मंडळांना दुष्काळग्रस्तांना मदतीचे आवाहन केले. धारावीतील हनुमान सेवा मंडळाने आपली पारितोषिक रक्कम दुष्काळ निवारणासाठी देण्याची घोषणा केली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments