प्रतिनिधी : तरुणाईला व्यसनाच्या विळख्यात ओढणाऱ्या अंमली पदार्थ तस्करांविरोधात कल्याण पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गांजा तस्करी प्रकरणात तब्बल १७ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत गांजा तस्करीप्रकरणी मोक्कांतर्गत झालेली ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे.
२ ऑगस्ट २०२५ रोजी दाखल या गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कार्यवाही पथकाकडून करण्यात आला. तपासादरम्यान आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून तब्बल ११५ किलो गांजा, तस्करीसाठी वापरलेल्या २ मोटारकार, १ बुलेट, १ ऑटो रिक्षा, १ ॲक्टीव्हा, १ पिस्तुल, २ जिवंत काडतुसे आणि २ वॉकी-टॉकी संच असा सुमारे ७० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, २१ ऑगस्ट रोजी विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश) येथे झालेल्या छाप्यात एका आरोपीकडून ६२ किलो गांजा, पिस्तुल आणि वॉकी-टॉकी संच जप्त करण्यात आले होते. तपासादरम्यान आणखी ४ आरोपींची नावे समोर आली असून, त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
प्राथमिक चौकशीतून उघड झाले आहे की, ही टोळी मागील तीन वर्षांपासून अंमली पदार्थांची खरेदी-विक्री, तस्करी आणि पुरवठा करून अवैध मार्गाने मोठा आर्थिक फायदा मिळवत होती. आरोपी एकमेकांच्या संपर्कात राहून विविध साथीदारांच्या मदतीने महाराष्ट्रातील ठाणे, कल्याण, बदलापूर, सोलापूर, पुणे तसेच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम परिसरात अंमली पदार्थ पुरवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या टोळीचा प्रमुख गुफरान हन्नान शेख असून, त्याच्यासह इतर १६ साथीदारांविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असून, ते गुन्हेगारीकडे वळत असल्याचेही गंभीर वास्तव पोलिस तपासातून समोर आले आहे. कल्याण पोलिसांची ही कारवाई अंमली पदार्थ विरोधात निर्णायक ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.