कराड(प्रताप भणगे) : श्री निनाई देवी विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक अभिमानास्पद यशाची भर पडली आहे. १७ वर्षांखालील मुलींच्या गटातील कराड तालुका शालेय लांब उडी स्पर्धेत अनुष्का आनंदा करांडे हिने उत्कृष्ट कामगिरी करत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिची आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या उल्लेखनीय यशामागे विद्यालयाचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक आनंदराव जानुगडे यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षक श्री दत्ता पाटील (वस्ताद काले) यांचे सखोल प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. जानुगडे सर हे शाळेतील विद्यार्थ्यांच्या क्रीडा प्रगतीसाठी सातत्याने कार्यरत असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, खो-खो, कुस्ती, लांब उडी अशा विविध खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर विशेष नैपुण्य प्राप्त केले आहे.
अनुष्काच्या या यशामुळे श्री निनाई देवी विद्यालयाची मान उंचावली असून, शाळेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तिच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. आनंदराव पाटील, सचिव बी. आर. यादव, मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी, तसेच वैभव जाधव, रघुनाथ पोतदार, अस्मिता पाटील, जयवंत काटेकर, विठ्ठल काटेकर, तसेच तुळसण, विठ्ठलवाडी आणि पाचुपतेवाडी येथील ग्रामस्थांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.