मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या बोरिवली शाखेने दि. ०५ ऑक्टोबर २०२५ रोजी राज्यस्तरीय काव्यस्पर्धा आयोजित केली होती. नुकत्याच झालेल्या नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचा विषय ‘स्त्रीशक्तीचा जागर’ अर्थातच स्त्री जाणिवांना अधोरेखित करणाऱ्या कविता असा ठेवण्यात आला होता. या स्पर्धेसाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, नेरुळ अशा अनेक भागातून स्पर्धक सहभागी झाले होते.
सर्वांनी आपली स्त्रीविषयक स्वरचित कविता सादर केली. या स्पर्धेला परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवयित्री, लेखिका संगीता अरबुने आणि कवी, लेखक संतोष खाडये लाभले होते. स्पर्धा झाल्यानंतर अत्यंत वेधक आढावा परीक्षकांकडून घेण्यात आला, ज्यात त्यांनी नवोदित कवींना मोलाचे मार्गदर्शनही केले. सर्व सहभागी कवींना संस्थेच्या वतीने सहभागी प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. ही प्रमाणपत्रे संस्थेचे शाखा अध्यक्ष जगदीश भोवड, ज्येष्ठ सल्लागार जनार्दन पाटील, कोषाध्यक्ष अनिल मोकाशी व कार्यकारिणीच्या सक्रिय सदस्या वंदना पाटील यांच्या हस्ते देण्यात आली.
*सुलक्ष्मी बाळगी यांना प्रथम क्रमांक*
या स्पर्धेचे मुळात तीन क्रमांक होते, मात्र कवींचा प्रतिसाद पाहता दोन उत्तेजनार्थ पारितोषिके ऐन वेळेस आयोजकांकडून वाढवण्यात आली. यात मेघना पाध्ये आणि रामदास कामत यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली, तर तृतीय क्रमांक सोनाली नाईक हिने पटकावला. मनोज धुरंधर हे द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरले असून प्रथम क्रमांकाच्या मानकरी सुलक्ष्मी बाळगी ठरल्या. स्पर्धेनंतर परीक्षकांनी एकूण स्पर्धेचा परामर्श घेऊन निकालाच्या निकषाविषयी सांगितले. या स्पर्धेची सर्व पारितोषिके वंदना पाटील यांनी प्रायोजित केली होती. या संपूर्ण स्पर्धेचे सूत्रसंचालन शाखेच्या सचिव, कवयित्री कीर्ती पाटसकर यांनी केले.