प्रतिनिधी : दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार अनिल देसाई यांनी आज सायन रेल्वे स्टेशन परिसरातील पुलाच्या कामाची पाहणी केली. यावेळी रेल्वे विभागाचे अधिकारी, ठेकेदार तसेच शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार देसाई यांनी पुलाचे काम पुढील पंधरा दिवसांत मार्गी लागणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच या परिसरात निर्माण झालेली वाहतूक कोंडी, गर्दी आणि बेकायदेशीर व्यवसायांवर त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ते म्हणाले, पादचारी पुलाचे काम लवकर पूर्ण झाल्यास शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. मी स्वतः पंधरा दिवसांनंतर पुन्हा या ठिकाणी येऊन कामाची पाहणी करणार आहे, त्यामुळे तेव्हापर्यंत काम पूर्ण झालेले दिसले पाहिजे.
सायन येथील पुलाचे काम सुरू असले तरी दिवाबत्तीच्या अभावामुळे नागरिकांना अंधारात प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचेही खासदारांनी निदर्शनास आणून दिले. प्रवाशांना, स्थानिक रहिवाशांना आणि विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन काम त्वरित पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
खासदार देसाई यांनी या संदर्भात रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई महापालिका आयुक्तांशी चर्चा करून सहकार्य मिळवण्याचे निर्देश दिले आहेत.
या पाहणीवेळी विभाग संघटक विठ्ठल पवार, विधानसभा प्रमुख वसंत नकाशे, विधानसभा समन्वयक प्रकाश आचरेकर, महादेव शिंदे, जोसेफ कोळी, जावेद खान, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले,युवा सेना विभागसघटक सनी शिंदे, युवासेना विभाग समन्वयक सतीश सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.