Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रउबाठा गटाचे आमदार जे. एम. अभ्यंकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका मुंबई...

उबाठा गटाचे आमदार जे. एम. अभ्यंकर यांना सर्वोच्च न्यायालयाचा झटका मुंबई शिक्षक मतदार संघातील वादग्रस्त निकालावरील विशेष विनंती याचिका फेटाळली

प्रतिनिधी : मुंबई शिक्षक मतदार संघातील उबाठा गटाचे आमदार जे. एम. अभ्यंकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. त्यांच्या वतीने दाखल करण्यात आलेली विशेष विनंती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत मुंबई उच्च न्यायालयात सुरु असलेल्या निवडणूक याचिकेवरील सुनावणीस परवानगी दिली आहे.

जून २०२४ मध्ये झालेल्या या निवडणुकीत श्री. अभ्यंकर यांनी विजय मिळविला होता. मात्र दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले शिक्षक भारतीचे उमेदवार सुभाष सावित्री किसन मोरे यांनी निवडणुकीचा निकाल आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मुंबई उच्च न्यायालयाने श्री. मोरे यांच्या याचिकेतील आरोपांची शहानिशा करण्यासाठी सुनावणी सुरू केली असता, श्री. अभ्यंकर यांनी ती सुनावणी थांबविण्याकरिता सर्वोच्च न्यायालयात विशेष विनंती याचिका दाखल केली होती.

७ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत श्री. अभ्यंकर यांच्या वतीने ज्येष्ठ वकील विपीन संघी यांनी उच्च न्यायालयाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु न्यायमूर्ती पी. नरसिंहा आणि ए. चांदूरकर यांनी ती मागणी फेटाळून याचिका रद्द केली. त्यामुळे श्री. सुभाष मोरे यांच्या निवडणूक याचिकेवरील सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयात नियमितपणे सुरू राहणार आहे.

या खटल्यात श्री. मोरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अमोल चितळे यांनी बाजू मांडली.

सुभाष मोरे यांच्या याचिकेतील आरोप
मुंबई शिक्षक मतदार संघाचा निकाल १ जुलै २०२४ रोजी जाहीर झाला. पहिल्या फेरीत श्री. अभ्यंकर यांना ३०७९ मते आणि श्री. मोरे यांना ३०११ मते मिळाली होती — केवळ ६८ मतांचा फरक होता. अंतिम फेरीत हा फरक २०८ मतांपर्यंत वाढला.

श्री. मोरे यांनी आपल्या याचिकेत असा आरोप केला आहे की, श्री. अभ्यंकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून ५८७ अपात्र मतदारांची नोंदणी केली. या मतदारांमध्ये प्लेग्रुप, माॅन्टेसरी, पूर्वप्राथमिक, प्राथमिक शाळांचे शिक्षक तसेच काही शिक्षकेतर कर्मचारी यांचा समावेश होता. अनेक मतदारांचे वय १८ ते २५ दरम्यान असून त्यांना तीन वर्षांचा आवश्यक अध्यापन अनुभव नसल्याचेही याचिकेत नमूद आहे.

तसेच श्री. अभ्यंकर सल्लागार किंवा विश्वस्त असलेल्या शाळांमधून अपात्र मतदारांची नोंदणी झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार श्री. सुभाष मोरे यांना विजयी घोषित करावे, अशी मागणी याचिकेत केली आहे.

कपिल पाटील यांची प्रतिक्रिया
या निर्णयाचे स्वागत करत माजी आमदार कपिल पाटील म्हणाले, उबाठा गटाचे आमदार अभ्यंकर यांनी वोटचोरी करून मुंबईतील शिक्षकांची फसवणूक केली आहे. ५८७ अपात्र मतदार वगळल्यास सुभाष मोरे यांचा विजय स्पष्ट आहे. मुंबईतील शिक्षकांनी नेहमीच शिक्षक भारतीवर विश्वास दाखविला आहे. हायकोर्टात शिक्षकांना न्याय मिळेल, याची खात्री आता अधिक बळकट झाली आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments