प्रतिनिधी : शिक्षकाने मनावर घेतले तर काय चमत्कार होऊ शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे पुणे जिल्यातील तालुका खेड येथील कनेरसर या गावातील जालिंदर नगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होय. या शाळेचे नाव जागतिक स्तरावर गेले असून वर्ल्ड बेस्ट स्कूल हा मानाचा किताब या शाळेने मिळवला आहे.
उपक्रमशील शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या अथक परिश्रमातून हे यश मिळाल्यामुळे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष अशोकराव टाव्हरे आणि पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष युवराज थोरात यांनी शाळेत जाऊन दत्तात्रय वारे गुरुजींचा सत्कार केला.
शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष विलास पुंडे, पदाधिकारी मोहन विधाटे, विजय थिटे, प्रदीप थोरात, बापु घोडेकर, दिवान विधाटे,उपसरपंच चांगदेव झोडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
जालिंदरनगर शाळेची सुसज्ज संगणक लॅब आणि विद्यार्थ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले रोबोट पाहून “सरकारी जिल्हा परिषद शाळादेखील दर्जेदार शिक्षण देऊ शकतात आणि भावी पिढीला जागतिक मंचावर संधी मिळवून देऊ शकतात,” असे टाव्हरे यांनी सांगितले. त्यांनी दत्तात्रय वारे गुरुजींचे विशेष कौतुक करत जागतिक स्तरावर शाळेला पोहोचवल्याबद्दल जिल्हाध्यक्ष युवराज थोरात यांनी अभिनंदन केले.