मुंबई(रमेश औताडे) : रुग्णाचा मृतदेह तब्बल पाच तास कुटुंबीयांना न देता, आधी पैसे भरा मग मृतदेह ताब्यात घ्या, अशा अमानवी कृत्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट उत्तर-पश्चिम जिल्हाध्यक्ष सचिन लोंढे यांनी रुग्णालयाचे संचालक तसेच संबंधित डॉक्टरांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सचिन लोंढे यांनी अंधेरी पूर्व पोलीस ठाण्यात पोहोचून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र साहेब यांची भेट घेत निवेदन सादर केले. हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह देण्यासाठी नातेवाईकांकडून पैशांची जबरदस्ती करण्यात आली, असा आरोप त्यांनी निवेदनात केला. याशिवाय रुग्णालयाशी संलग्न मेडिकल स्टोअरमधून औषधे घेण्याची सक्ती करून त्यावर दुप्पट दर आकारले गेल्याचेही नमूद करण्यात आले. या निवेदनाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी मेडिकल ऑफिसर आणि विशेष समिती नेमून सजीवन ममता रुग्णालयाची तातडीने चौकशी केली जाईल आणि दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल, असे आश्वासन दिले.