नागपूर(नारायण जाधव) — महाराष्ट्रासह देशात रिपब्लिकन पक्ष खोरिपा पक्ष पुन्हा नव्या जोमाने उभा करु. त्यासाठी संपूर्ण राज्यात आणि देशात ठिकठिकाणी फिरुन आंबेडकरी जनतेला विश्वासात घेऊन एक प्रबळ विरोधी पक्ष उभा करून दाखवू असा ठाम निर्धार रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी व्यक्त केला.
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र, राज्यसभेचे माजी उपसभापती तथा रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे राष्ट्रीय अधिवेशन पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेतर्फे येथील अशोक नगरमधील इंदोरा येथे अलिकडेच आयोजित करण्यात आले होते.त्यावेळेस देशक गिरीशबाबू खोब्रागडे हे बोलत होते.
खोब्रागडे पुढे म्हणाले प्रामाणिक, निष्ठावंत, त्यागी कार्यकर्ते आजही मोठ्या संख्येने रिपब्लिकन पक्ष खोरिपात येत आहेत. त्यांच्या जोरावर रिपब्लिकन खोरिपाला जोमाने उभे करणे शक्य आहे.
_
_रिपब्लिकनचे गट एकत्र स्थानिक स्वराज्यच्या निवडणुका लढवणार__
राज्यात होणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटातील नेत्यांना एकत्र करून निवडणुका लढवणार आहे ,असेही देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांनी जाहीर केले. जर रिपब्लिकन पक्षाच्या इतर गटाच्या नेत्यांनी आमच्या सोबत यायला नकार दिला तर मात्र आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू शकतो असेही खोब्रागडे यांनी स्पष्ट शब्दात सांगितले.
विद्यमान परिस्थितीतून देशाला बाहेर काढण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची देशाला आवश्यकता आहे,असे पक्षाचे प्रवक्ते प्रशिक आनंद , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे,प्रा मुकुंद मेश्राम, डॉ विनायक गणवीर यांनी अधोरेखित केले. ते देशातील वर्तमान राजकीय परिस्थिती,आव्हाने व उपाययोजना या विषयावरील परिसंवादात बोलत होते.
_पक्षाच्या दिवंगत नेत्यांना आदरांजली_
यावेळी पक्षाचे संस्थापक सरचिटणीस दिवंगत नेते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, दिवंगत हरिदास बाबू आवळे, दिवंगत माजी आमदार उपेंद्र शेंडे, दिवंगत मारोतराव कांबळे यांचे पुतळे,प्रतिमांना पक्षाच्या मान्यवर नेत्यांनी पुष्पहार अर्पण करुन पक्षाच्या वतीने या नेत्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली.
या अधिवेशन प्रसंगी विदर्भ प्रदेश अध्यक्ष सी. पी. रामटेके,राष्ट्रीय प्रवक्ते डॉ.एन. व्ही. ढोके, प्रकाश तारु-अध्यक्ष रिपब्लिकन विद्यार्थी फेडरेशन, महाराष्ट्र प्रदेश,आयु गच्चे- अध्यक्ष, मराठवाडा प्रदेश, संघमित्रा खोब्रागडे,सुदेश शेंडे,कमलेश मेश्राम, आनंद वानखेडे, चंद्रमणी गजभिये,रवि पाटील,किशोर सोमकुवर,राजू भाऊ गजभिये, अजयकुमार बोरकर,प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे,प्रक्षांत डांगे यासह पक्षाचे नेते, पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
__अधिवेशन वैचारिक क्रांतीने_ _दुमदुमले_
_
यावेळी रिपब्लिकन चळवळीत महिला,युवक, विद्यार्थी यांचा सहभाग काळाची गरज,देशातील वर्तमान राजकीय परिस्थिती आव्हाने व उपाययोजना या विषयांवरील परिसंवाद चांगले रंगले.यानंतर खुल्या अधिवेशनात
राष्ट्रीय अध्यक्ष देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली खुले अधिवेशन झाले.परिसंवाद आणि खुल्या अधिवेशनातील विचारांच्या अदान प्रदानातून रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे हे राष्ट्रीय अधिवेशन वैचारिक क्रांतीने चांगलेच दुमदुमले.खुल्या अधिवेशनात उत्तमराव गवई राष्ट्रीय सरचिटणीस, उपाध्यक्ष डॉ शिवशंकर बनकर, विदर्भवादी नेते अरुण केदार, सुनिल चोखारे, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डॉ देवेश मारोतराव कांबळे,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस जीवन बागडे, उपाध्यक्ष सी एम रामटेके, विनोद साळवी,अतिरिक्त सरचिटणीस प्रा. अशोक ढोले, चंद्रकांत वाघमारे, मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनोहर भिडे आदींनी आपले विचार मांडले.
_अधिवेशनात १८ ठराव मंजूर_
या अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशक गिरीशबाबू खोब्रागडे यांच्या निवडीला मंजुरी, राज्यातील विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द करण्यात यावे, २१ जून १९७९ रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्थसंकल्पातील १५ टक्के रक्कम अनुसूचित जाती करीता राखीव ठेवण्यात यावी,अनुसूचित जाती जमातीचा अर्थसंकल्पातील निधी इतरत्र वळविण्यात येऊ नये यासाठी कायदा करण्यात यावा,अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी आदी १८ ठराव मांडून त्यांना टाळ्यांच्या गजरात मंजुरी देण्यात आली.
रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय अधिवेशन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात नागपूरनगरीत संपन्न झालेले आहे.या अधिवेशनाने कार्यकर्त्यांत चेतन्य आलेले.या अधिवेशनापासून प्रेरणा घेऊन कार्यकर्त्यांनी कामालाही सुरुवात केलेली आहे.निश्चितच रिपब्लिकन पक्ष खोरीपा राज्यासह देशात राजकीय क्षितिजावर एक चांगली आघाडी घेईल हा विश्वास आहे.