मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील तेजस्वी नाव, आपल्या नृत्यकौशल्याने आणि मोहक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम (विजया देशमुख) यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टीत एका सुवर्णकाळाचा पडदा खाली आल्याची भावना रसिकवर्गातून व्यक्त होत आहे.
१९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा’ चित्रपटातील ‘चंद्रा’ ही संध्या यांची भूमिका आजही लोकांच्या स्मरणात ताजी आहे. हावभाव, नृत्य आणि अभिनयाचा अप्रतिम संगम असलेल्या या भूमिकेने संध्या यांना मराठी चित्रपटसृष्टीत अमर स्थान दिले.
विजया देशमुख ते संध्या शांताराम
संध्या यांचा पहिला चित्रपट ‘अमर भूपाळी’ होता. मात्र खरी झेप त्यांना मिळाली ती ‘नवरंग’ (१९५९) या चित्रपटातून. “अरे जा रे हट नटखट” या गाजलेल्या गाण्यात त्यांनी दाखवलेले नृत्य आजही रसिकांना मोहित करते. या गाण्यासाठी त्यांनी खास शास्त्रीय नृत्याचे प्रशिक्षण घेतले होते. नृत्यदिग्दर्शक नसतानाही, गाण्याचे प्रत्येक पाऊल त्यांनी आणि दिग्दर्शक शांताराम यांनी स्वतः तयार केले.
धाडस आणि समर्पण
‘नवरंग’च्या चित्रीकरणावेळी खरे हत्ती-घोड्यांच्या उपस्थितीत त्यांनी नृत्य केले. कोणतीही भीती न बाळगता त्यांनी बॉडी डबल नाकारले आणि प्राण्यांशी स्वतः मैत्री करून चित्रीकरण यशस्वी केले. या धाडसाने आणि समर्पणाने व्ही. शांताराम भारावून गेले आणि त्यानंतर त्यांच्या अनेक चित्रपटांत संध्या अग्रणी ठरल्या.
अमर चित्रपट, अविस्मरणीय भूमिका
‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, ‘नवरंग’, ‘अमर भूपाळी’ आणि ‘पिंजरा’ या चित्रपटांनी संध्या यांची ओळख केवळ अभिनेत्री नव्हे तर भारतीय सिनेमातील एक क्लासिकल ब्युटी आणि आर्टिस्टिक परफेक्शन म्हणून दृढ केली.
संध्या यांच्या निधनानंतर चाहत्यांसह अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.