Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रराज्य रोजगार मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती

राज्य रोजगार मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत 6 उमेदवारांना अनुकंपा नियुक्ती

नवी मुंबई : मुख्यमंत्री महोदय यांच्या संकल्पनेतील 150 दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत लोकाभिमुख कारभारासोबतच गतीमानतेने निर्णय घेण्याच्या प्रक्रियेकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. यामध्ये राज्यातील अनुकंपा नियुक्तीची प्रक्रिया वेगवान करण्यावर भर देण्यात आला होता व याबाबतची कार्यवाही जलद गतीने विहित कालमर्यादेत पूर्ण करण्याकडेही शासनामार्फत विशेष लक्ष दिले जात होते. याव्दारे त्या कुटुंबांच्या भावनांचा आणि गरजांचा अत्यंत सह्रदयतेने विचार करण्यात आला होता.

नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वीही 100 दिवसांच्या कृती आराखडा उपक्रमात महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तम कामगिरी करून राज्यातील महानगरपालिकांमध्ये तृतीय क्रमांकाचे मानांकन संपादन केले होते. त्याच धर्तीवर 150 दिवसांच्या कार्यक्रमामध्येही अधिक कृतीशील होत सुयोग्य कार्यपध्दतीवर भर देण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने 150 दिवसांच्या कार्यक्रमातील एक भाग असलेल्या अनुकंपा तत्वावरील नियुक्त्यांमध्येही नवी मुंबई महानगरपालिकेने आत्यंतिक संवेदनशीलता जपत 6 कर्मचा-यांना अनुकंपा तत्वावरील नेमणूकपत्र दिलेले आहे. आज मुंबईमध्ये झालेल्या राज्यस्तरीय रोजगार मेळाव्यामध्ये अनुकंपा व लिपिक भरती नियुक्ती आदेश मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते, उपमुख्यमंत्री ना.श्री.अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रातिनिधीक स्वरूपात प्रदान करण्यात आले.

त्याप्रसंगी नमुंमपा प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे हे नवी मुंबई महानगरपालिकेने अनुकंपा तत्वावरील नियुक्तीपत्र दिलेले कनिष्ठ अभियंता (विद्युत) शुभम प्रशांत गायकवाड, शिपाई पदावर नियुक्तीपत्र दिलेले उमेदवार स्मिता चंद्रकांत कांबळे, शुभम निळकंठ तांबे, मनोज रामचंद्र भगत, कविता शिवराम ढुमणे, शुभम खंडू उघडे यांच्यासह कार्यक्रमास उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अनुकंपा तत्वावरील भरतीबाबत आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सातत्यपूर्ण कार्यवाही सुरू असते. त्यामुळे या 150 दिवसांच्या कार्यक्रमातही नमुंमपा प्रशासनाने तत्पर कार्यवाही केली आणि एका उमेदवारास ‘गट – क’ मध्ये, तसेच 5 उमेदवारांस ‘गट – ड’ मध्ये अनुकंपा नियुक्तीपत्र राज्यस्तरीय रोजगार मेळावा कार्यक्रमाठिकाणी प्रदान केले आहे.

नमुंमपा प्रशासनामार्फत नियमित कार्यवाहीच्या अंगिकारलेल्या पध्दतीमुळे अनेक प्रलंबित प्रकरणे मार्गी लागली आहेत. या नियुक्ती प्रक्रियेत नियमांचे पालन करण्यात आलेच, शिवाय प्रत्येक कुटुंबाच्या भावनांचा आणि गरजांचाही संवेदनशीलतेने विचार करण्यात आला आहे. यामुळे या घरांमध्ये आनंद परतला आहे. म्हणूनच हे नियुक्ती पत्र म्हणजे केवळ एक कागद नसून, ते एका कुटुंबाचे भविष्य आहे, त्यांच्या आत्मसन्मानाची पुनर्स्थापना आहे अशी भावना मेळाव्यामध्ये व्यक्त करण्यात आली.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments