म
ुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यासोबत २०१४ पासून सातत्याने कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठान या संस्थेच्या कामाचा आवाका आणि अनुभव लक्षात घेऊन, कोकाकोला हिंदुस्थान बेव्हरेज व आनंदाना – द कोकाकोला फाउंडेशन यांच्या सहकार्याने म्हैसूर महानगरपालिकेने नवरात्री महोत्सवातील सुका कचरा व्यवस्थापन आणि पेट बॉटल कलेक्शन ड्राइव्ह साठी विशेष निमंत्रण दिले होते.
संगम प्रतिष्ठानच्या सचिव ॲडव्होकेट कोमल तानाजी घाग यांच्या नेतृत्वाखाली ३० स्वयंसेवक व स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने २२ सप्टेंबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत उपक्रम राबविण्यात आला. या मोहिमेतून तब्बल १२०३ किलो पेट बॉटल्स संकलित करण्यात आल्या. या बाटल्यांचा उपयोग करून कोकाकोला कंपनीच्या सहकार्याने सृजनशील भिंत (क्रिएटिव्ह वॉल) उभारण्यात येणार आहे.
गेल्या दहा दिवसांत मुंबईहून म्हैसूर शहरात पोहोचून वेस्ट मॅनेजमेंट अवेअरनेस व कलेक्शन ड्राइव्ह यशस्वीपणे राबविल्या बद्दल म्हैसूर महानगरपालिकेच्या सन्माननीय आयुक्तांनी दखल घेत मानपत्र व मोमेंटो प्रदान करून सन्मान केला.
या प्रसंगी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सातत्यपूर्ण सेवेसाठी तसेच पर्यावरणपूरक कार्यासाठी संगम प्रतिष्ठान व सचिव ॲडव्होकेट कोमल तानाजी घाग यांच्या कार्याचे विशेष कौतुक करण्यात आले.
हा उपक्रम मुंबईच्या वेस्ट मॅनेजमेंट पद्धतीचा देशभरातील नगरपालिकांसाठी एक आदर्श ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.