मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत कायदेशीरदृष्ट्या परिपूर्ण आणि अद्ययावत अशी मतदार यादी वापरण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेऊन दिले.
१ जुलै २०२५ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांसाठी तयार केलेली मतदार यादी आधारभूत धरून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या यादीबाबत राजकीय पक्षांकडून किंवा नागरिकांकडून आक्षेप अथवा सूचना मागवण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे ती यादी कायदेशीररीत्या परिपूर्ण मानली जाऊ शकत नाही, असे मत व्यक्त करत शिवसेनेने या यादीस विरोध दर्शविला आहे.
तसेच, १ जुलैनंतर नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान प्रक्रियेत समाविष्ट करणे, तसेच निवडणुकीत ईव्हीएमबरोबरच व्हीव्हीपॅटचा वापर करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली.
या वेळी राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनाही निवेदन देण्यात आले. खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात शिवसेना उपसचिव प्रवीण महाले, सचिन परसनाईक, भा.वि.क. सेना महासंघाचे सरचिटणीस दिनेश बोभाटे आदींचा समावेश होता.
शिवसेनेने स्पष्ट इशारा दिला की, परिपूर्ण मतदार यादी शिवाय निवडणुका घेतल्या गेल्यास लोकशाही प्रक्रियेवर अन्याय होईल.