बिदाल (ता. माण, जि. सातारा) : डॉ. सुरेश रुक्मिणी परशुराम जगदाळे (सेवानिवृत्त सिव्हिल सर्जन, सातारा व नाशिक) यांचा सहकुटुंब नुकताच “सरस्वतीबाई दादासाहेब फाळके पुरस्कार – स्मृती सन्मानचिन्ह” देऊन मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मा. दुष्यंतकुमार गौतम यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.
सामान्य शेतकरी कुटुंबातून शिक्षण घेतलेल्या डॉ. जगदाळे यांनी बिदाल येथून प्राथमिक-माध्यमिक शिक्षण पूर्ण करून मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस व एमएस (जनरल सर्जरी) या उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. खाजगी व्यवसायाऐवजी सार्वजनिक आरोग्य विभागाची सेवा स्वीकारून त्यांनी १९८३ पासून महाराष्ट्रातील दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवा देण्याचा संकल्प केला.
कोल्हापूर व सातारा जिल्हा रुग्णालयात शेकडो मोठ्या शस्त्रक्रिया करून हजारो रुग्णांना नवे जीवनदान दिले. सातारा येथील सिव्हिल हॉस्पिटलला त्यांनी “राज्यातील सर्वोत्तम रुग्णालय” हा किताब मिळवून दिला. सेवाकाळाच्या उत्तरार्धात नाशिक सिव्हिल सर्जन म्हणून सहा वर्षे कार्य करताना त्यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया, बालकांच्या हृदयशस्त्रक्रिया यांसारखी उपक्रम राबवून जनतेला दिलासा दिला. नाशिक सिव्हिल हॉस्पिटललाही त्यांनी राज्यात सलग तीन वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवून दिले. कोरोनाच्या काळातही त्यांनी जनतेसाठी जीवाची पर्वा न करता कार्य केले.
सेवानिवृत्तीनंतर सध्या ते प्रवरा वैद्यकीय महाविद्यालय, लोणी येथे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असून समाजसेवा अखंड सुरू आहे. आपल्या या सन्मानाचे श्रेय त्यांनी कुटुंबीय, बिदालचे नागरिक, गुरुजन व सहकारी यांना अर्पण केले.