स
ातारा(विजय जाधव) : शासनाच्या आदेशानंतर अवघ्या काही दिवसांत नियोजनपूर्वक आखणी करून बोपर्डी ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात तालुक्यात अग्रेसर राहण्यासाठी सारा गाव एकवटू सक्रिय योगदान देत आहे.
दि.१७ सप्टेंबर रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. त्यानंतर ‘ओटी मातृवाची’ या उपक्रमातून महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
नुकत्याच झालेल्या ग्रामसभेस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग) प्रज्ञा माने, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, पंचायत समिती वाईचे माजी सभापती उपसभापती, सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच, विविध मान्यवर उपस्थित होते.
सरपंच शंकर गाढवे (बापू) यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच ऋषिकेश गाढवे यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली.
ग्रामसभेत गटविकास अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अभियानाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. गावात सुरू असलेल्या लोकसहभागातून नियोजन आणि अंमलबजावणी यांचे कौतुक केले. अभियानांतर्गत धार्मिक स्थळे, शासकीय कार्यालये, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंतर्गत रस्ते, पाणवठे, स्मशानभूमी, बौद्धविहार आदी ठिकाणांची स्वच्छता, सुशोभीकरणाची कामे ग्रामस्थ, शाळकरी मुले, आयटीआय विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स , आरोग्य कर्मचारी यांच्या सहभागातून झाली.
गावात नियमित श्रमदान करत सातत्याने कामे केली जात आहेत.