Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रराष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ऐतिहासिक वर्धापनदिन!

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ऐतिहासिक वर्धापनदिन!

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या स्थापनेमागे सत्य आणि ऐतिहासिक घटनांचा संदर्भ आहे! राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना २९ सप्टेंबर १९४७ रोजी,विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली.राष्ट्रीय मिल मजदूर संघाचा ७९ वा वर्धापनदि विजयादशमीच्या पूर्वसंध्येला(आज) १ नोव्हेंबर २०२५ रोजी,सकाळी ११ वाजता मनोहर फाळके सभागृह, परळ,येथे संपन्न होत आहे.समारंभाचे अध्यक्षस्थान संघटनेचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर भूषवित असून,सरचिटणीस गोविंदराव मोहिते आंबेकरजींच्या अभूतपूर्व कार्याला उजाळा देतील.
कामगार महर्षी गं.द. आंबेकर यांनी कामगार चळवळीच्या अध्यायनाला १९३७ मध्ये वर्धा येथील महात्मा गांधी विचारावर आधारित ‘”हिंदुस्तान मजदूर सेवा संघा”त आपल्या मित्रांसमवेत तीन महिन्याचे कामगार प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षण काळात स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या सानिध्यात राहण्याची संधी त्यांना मिळाली. प्रशिक्षण पूर्ण होताच, वल्लभभाई पटेल यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी सेवाग्राममध्ये आपल्या
मपारा, खाडिलकर आणि आठवले या तीन मित्रांसमवेत
महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि आशीर्वाद घेतले.त्यानंतर त्यांनी नागपूर येथे होमिओपाथिक व बायोकेमिकल औषध उपचाराचे शिक्षण घेतले.पुढे१९५७ मध्ये मुंबईत हिवतापची साथ सुरू झाली.गिरण्यातील सुमारे ४०,००० कामगारांना त्यांनी सुरू केलेल्या औषधोपचाराचा फायदा घेतला. मानवतेच्या भावनेने गिरणी कामगारांच्या हृदयापर्यंत पोचणारे आंबेकरजी त्यावेळे पर्यंततरी एकमेव कामगार नेते होत.१९३८ मध्ये कामगार चळवळीचा श्रीगणेशा त्यांनी कॉटनग्रीन येथील कापसाच्या गोडाऊन मधील असंघटीत कामगारांना न्याय मिळवून देत केला.त्यावेळी “कामगार सेवा संघा”ची स्थापना केली आणि शिवडी येथील गोदामानजीक वाकड्या चाळीत तळ मजल्यावर आपले कार्यालय थाटले.पुढे लालबाग येथील ‘वीरमहल’ आणि बैलघोडा समोर कार्यालय थाटले.त्याच वेळी १९६४ मध्ये डॉक्टर शिरोडकर हायस्कूलचे संस्थापक, डॉक्टर शिरोडकर यांच्या मध्यस्थीने परेल व्हिलेज येथे गिरणी कामगारांच्या कष्टावरच आजची भव्य वास्तू उभी केली.सर्व आधुनिक सोयींनी युक्त अशी युनियनची भव्य वास्तू संपूर्ण आशिया खंडात पाहायला मिळत नाही, असे अनेक परदेशी अभ्यासकांनी बोलून दाखवले आहे.या भव्य वास्तूचे उद्घाटन तत्कालीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांनी‌ १३ एप्रिल १९६२ रोजी श्रीरामनवमीच्या शुभमुहूर्तावर केले होते.या एवढ्या एकाच गोष्टीवरुन गं.द.आंबेकर यांच्या गगनाला गवसणी घालणाऱ्या विशाल कर्तृत्वाची साक्ष पटते.आंबेकरजी काळाचा,भविष्याचा अचूक वेध घेणारे कामगार नेते होते.सरकत्या महागाई निर्देशांकावर आधारित पगारवाढ,नफ्यावर आधारित बोनस,भरपगारी रजा,ग्रॅच्युइटी,भविष्य‌ निर्वाहनिधी,बदली कामगारांना कायम करण्याचे सूत्र,अशा अनेक गोष्टीतून त्यांनी गिरणी कामगारांना सबळ आर्थिक पायावर उभे केले.आंबेकरजींचे‌ हे‌ सूत्र त्या वेळी अनेक राज्यांतील‌ कामगार संघटनांनी मार्गदर्शक तत्वे म्हणून स्वीकारले आहे. त्याकाळी आंबेकरजींनी गिरणी कामगारांसाठी गृहनिर्माण योजना राबवून कामगार संघटनेला विधायक चळवळीचा वारसा दिला.न्यायालयात तर ते स्वतःच कामगार विषयक आर्ग्युमेंट करीत.आजच्या इमारतीत स्वतःचे प्रिंटिंगप्रेस,कामगार साप्ताहिक सुरू करणारे संपूर्ण देशात तेच एकमेव कामगार नेते होत.आयुष्यभर अविवाहित राहून ते ऋषीतुल्य जीवन जगले.ते मुळचे सदन घरचे परंतु गिरणी कामगारांच्या कल्याणासाठी ते वैराग्याचे जीवन जगले!
इंटक स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता.इंटकचे प्रतिनिधी म्हणून आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेत (आय.एल.ओ.मध्ये) देशातील कामगारांची बाजू मांडून त्यांनी आर.एम.एम.एस.चे नाव सातासमुद्रापालीकडे परदेशात केव्हाच पोहोचवले आहे!
त्यांची कामगार संघटना कर्तृत्वाचे वलय घेऊन पुढे आली.त्याच वेळी ज्येष्ठ कॉंग्रेस नेते एस.के.पाटील यांची कामगार संघटना पुढे आली.परंतु एकाच कॉंग्रेस पक्षाच्या दोन‌ कामगार संघटनांनी मुंबईत काम करणे कॉंग्रेस श्रेष्ठीना योग्य वाटले नाही.अखेर स्वातंत्र्य लढ्याचे अग्रणी सरदार वल्लभभाई पटेल यांच्याच मध्यस्थीने आंबेकर आणि एस.के.पाटील यांच्या युनियनचे २९ सप्टेंबर १९४७ रोजी एकत्रिकरण झाले.तिच ही ७९ वर्षे न थांबता काम करणारी,कामगार संघटना,राष्ट्रीय मिल मजदूर संघ! एखाद्या अविचल “एव्हरेस्ट शिखरा” प्रमाणे ताठ मानेने वर्षोनुवर्षे आपले सेवाव्रत पूर्ण करीत आहे.

लेखक – काशिनाथ माटल

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments