मुंबई : नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा.पाटील यांचे नाव दिल्याशिवाय येत्या ६ ऑक्टोबरला विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही अशी जाहीर घोषणा बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी नुकतीच एकतर्फी केली होती. बाळ्यामामांची ही कृती म्हणजे विमानतळाच्या नामाकरणाच्या श्रेयवादासाठीचा खोटारडेपणा असल्याचा घणाघाती आरोप भाजपाचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केला.
मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रामशेठ ठाकूर यांनी बाळ्यामामांचा खोटारडेपणा उघड केला. नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समिती गठीत करण्यात आली आहे. असे असताना या कृतीसमितीला अंधारात ठेवून रविवारी कोपरखैरेणे येथे खासदार बाळ्यामांमांनी विमानतळाच्या नामांतरासाठी एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विमानतळाला दि.बा.पाटीलांचे नाव दिल्याशिवाय पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन होऊ देणार नाही असे प्रसिद्ध पत्रक बाळ्या मामांच्या नावाने सर्व प्रसारमाध्यमांना पाठविण्यात आले आणि त्या बैठकीस रामशेठ ठाकूर उपस्थित असल्याची खोटी माहिती देण्यात आली. माझ्या नावाचा जाणीव पुर्वक खोटा उल्लेख करण्यात आला असे रामशेठ ठाकूर यांनी यावेळी स्पष्ट केले. माझ्या नावाचा जाणीवपुर्वक खोटा वापर करून कृती समितीत संभ्रम निर्माण करण्याचा हा डाव आहे असा आरोपही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि स्वता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही याबाबत शब्द दिला आहे त्यामुळे नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा पाटील यांच्याशिवाय दुसऱ्या नावाचा कुठेही विचार नाही. कुणी संभ्रम पसरवित असेल तर त्यांना पुर्ण क्षमतेने रोखले जाईल असा इशाराही रामशेठ ठाकूर यांनी यावेळी दिला.