मुंबई : कस्तुरबा रुग्णालयात घडलेला प्रकार केवळ एका कर्मचाऱ्याचा नव्हे, तर समाज जागृतीचे अग्रदूत प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा अपमान करणारा असल्याने शहर भरातून संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात दोषी परिचारिकांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.
कक्ष सहाय्यक म्हणून काम करणारे राजेंद्र कदम हे 28 जुलै 2025 रोजी सेवानिवृत्ती पूर्वी सहकाऱ्यांना प्रबोधनपर साहित्य वाटत होते. त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचे “देवळाचा धर्म व धर्माची देवळे” आणि दिनकरराव जवळकर यांचे “देशाचे दुश्मन” ही पुस्तके वाटप केली. मात्र रात्रपाळीतील परिचारिका श्रीजा सावंत यांनी या पुस्तकांना “विकृत” म्हणत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला.
पुढील सकाळी कदम यांना कार्यालयात बोलावून उग्र वाद घालत त्यांच्या हातातील पुस्तके चेहऱ्यावर फेकून अपमान केला. एवढ्यावरच न थांबता जबरदस्तीने माफी मागायला लावली आणि त्या माफीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केला, असा गंभीर आरोप आहे.
या घटनेनंतर कदम यांनी महापालिका आयुक्त, कस्तुरबा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक आणि आग्रीपाडा पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. मात्र, रुग्णालय प्रशासनाने “पोलिसांत तक्रार द्या” असा सल्ला देत स्वतःची जबाबदारी झटकली, अशी नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रबोधनकार ठाकरे यांच्या कार्याचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, साहित्यिक आणि विविध प्रबोधनवादी संघटना यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून “विचारांचा अपमान सहन केला जाणार नाही” असे स्पष्टपणे सांगितले जात आहे. दोषींवर कठोर शिस्तभंगाची आणि कायदेशीर कारवाईची मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे.
या प्रकरणाचा पाठपुरावा करून प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा सन्मान राखण्यासाठी महापालिकेने त्वरित पावले उचलावी, अशी जोरदार मागणी शहरातील बुद्धिजीवी वर्ग व प्रबोधनवादी संघटनांकडून केली जात आहे.