कराड
– कराड तालुका शासकीय कबड्डी स्पर्धेत गुरुकुल विद्यालय, घोगाव संघाने १४ वर्षांखालील गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी कार्वे विद्यालयाचा एकतर्फी पराभव करून शानदार विजय मिळवला.
या स्पर्धा एंजल्स पब्लिक स्कूल, विरवडे-करवडी येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांच्या संघांनी उत्साहात सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच गुरुकुल विद्यालय, घोगावच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. त्यांचा बचाव आणि चढाई दोन्ही भक्कम होत्या.
अंतिम सामन्यात गुरुकुल विद्यालयाने सुरुवातीपासूनच सामन्यावर आपली पकड निर्माण केली. त्यांनी प्रतिस्पर्धी कार्वे विद्यालयाच्या संघाला फारशी संधी दिली नाही. खेळाडूंच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर गुरुकुलने हा सामना मोठ्या फरकाने जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या विजयामुळे गुरुकुल विद्यालय आणि घोगाव गावाचे नाव पुन्हा एकदा कबड्डीच्या क्षेत्रात गाजले आहे. विजेत्या संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विजय संघातील सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक वैभव नरगे मुख्याध्यापक संदीप सूर्यवंशी, श्री कोकरे तसेच संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.