म
्हसवड(अजित जगताप) : महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात कोसळणाऱ्या पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती पाहण्यास मिळाली. आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे जोरदार मागणी करण्यात आली. त्याच वेळी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भाग ओळखणाऱ्या म्हसवड नगरीत पहाटे कोसळलेल्या पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असली तरी माणुसकी सुद्धा धावून आली .संकट समयी माणुसकी तरंगत असल्याचे दिसून आले.
याबाबत माहिती अशी की, दुष्काळी माण , खटाव तालुक्यातील बाजारपेठेचे व आराध्य दैवत सिद्धनाथ आशीर्वादाने उभे असलेल्या म्हसवड नगरीत दरवर्षी पाऊस कोसळतो. कमी जास्त प्रमाणात पावसामुळे नुकसान होत असले तरी यंदा मात्र त्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. विशेषता सातारा- पंढरपूर रस्ता व शिंगणापूर चौक आणि रस्त्यावर सकल भागात पाणी साचल्यामुळे खऱ्या अर्थाने काही भागातील अतिक्रमणाचा मुद्दा ही आता दबक्या आवाजात चर्चेत आला आहे.
नैसर्गिक ओढे नाले पूर्वी पावसाच्या पाण्याचा प्रवाह वाहता ठेवत होते. परंतु काहींच्या अतिक्रमणामुळे मुसळधार पावसात अतिवृष्टी, ढगफुटी यासारख्या पावसाच्या तडाख्याने सर्व काही मानगंगा नदीचे पाणी पारंपारिक मालकी हक्कानुसार रस्त्याच्या दुतर्फी पसरून गेले होते. अखेर इंजिनच्या साह्याने बेसमेंट मधील पाणी बाहेर काढण्यास सुरुवात झाली आहे. विशेषता रस्त्या नजीक व्यवसायासाठी अनेकांनी गाळे घेतले .त्यामध्ये मेडिकल, कपडे, मोबाईल शॉपी, पान टपरी तसेच गॅरेज थाटण्यात आले होते. पण मानगंगेला आलेल्या पुरासोबतच पावसामुळे अक्षरशा जलाशय निर्माण झाले . संकटाची चाहूल लागताच माणुसकी सुद्धा धावून आली आहे. म्हसवड नगरीतील सामाजिक कार्यकर्ते सुनील पोरे, नितीन दोशी, विजय सिन्हा, बाळासाहेब पिसे, करण पोरे, अजिनाथ केवटे, राजेंद्र पोळ, बाळा रणपिसे, मुलाणी, सरतापे
यांच्यासह अनेकांनी आपापल्या परीने लोकांना दिलासा देण्याचे काम केले. राज्याची ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे, युवा नेते शेखर गोरे यांच्या सूचनेनुसार म्हसवड पूर परिस्थितीमध्ये मदतीचा ही ओघ सुरू झालेला आहे. शनिवारी हा घात वार ठरला असून पहाटे तीन वाजल्यापासून कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. दिवस उजेडताच राजकारण बाजूला ठेवून एकमेकांच्या मदतीसाठी म्हसवडकर रस्त्यावर उतरले. काही दवाखान्यामध्ये सुद्धा पायरी पर्यंत पाणी आल्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनाही काळजी वाटू लागली होती. परंतु त्यांनाही दिलासा देण्याचे काम झाले.
म्हसवड बस स्थानका परिसरातही पावसाच्या पाण्याने वेढा दिला होता. म्हसवड नगरीत पाचशे ते एक हजार मीटर पर्यंत जलाशय निर्माण झाला होता. मानगंगेला आलेला पूर थेट बेसमेंट मधील दुकानातला स्पर्श करत होता. यामुळे या परिसरात किमान सव्वा ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. यामध्ये किमती मोबाईल ,कपडे व औषधाचे साहित्य सुद्धा पुराच्या पाण्यामुळे नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, म्हसवड येथे मानगंगेला पूर आल्यानंतर अतिक्रमणाची चर्चा होते. कडक उन्हाळ्यात ती सुकून जाते. याबाबत आता राजकारण विरहित कधीतरी उपाययोजना करावीच लागणार आहे. याबाबतही आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली असल्याची माहिती स्थानिकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे.
———– ——– —— —
फोटो —
म्हसवड नगरीला आलेला माणगंगा नदी पूर. (छाया– निनाद जगताप, म्हसवड)