Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्रनागपूर, विदर्भअतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार ...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार                                  – मुख्यमंत्री

प्रतिनिधी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल, त्यासाठी नियमांची अडचण येऊ दिली जाणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला.

जळगाव विमानतळावर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधतांना श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, किशोर पाटील, अमोल जावळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या, पाचोरा, भडगाव, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, जळगाव, एरंडोल या तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधला. त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकरात लवकर मदत दिली जाईल असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानी संदर्भात निकषात कोणाला न अडविता सर्वांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. नुकसान भरपाईसाठी फक्त नुकसानाची नोंद असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो स्वतः काढले असतील तेदेखील मान्य करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

नुकसानी संदर्भात राज्यातील ज्या भागांचे पंचनाम्यांचे अहवाल शासनाकडे प्राप्त झाले आहेत त्यांच्यासाठी शासनाने या अगोदर २ हजार ३०० कोटी रुपये दिले असून इतर भागांचे पंचनामे शासनास प्राप्त झाल्यावर आवश्यक मदत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.

अतिवृष्टीच्या आपत्ती काळात स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने धीर देऊन मदत केल्याबद्दल अतिवृष्टीग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments