पुणे : गेली १६ वर्षे विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रकाशित होणाऱ्या “भविष्य” दिवाळी अंकाचे प्रकाशन यंदा नवरात्रोत्सवाच्या प्रारंभी इंडियन बँक व आयडीबीआय बँकेचे माजी एमडी आणि सीईओ श्री. किशोर खरात यांच्या हस्ते झाले. हा अंक आता वाचकांसाठी उपलब्ध आहे.
प्रकाशन समारंभाला प्रथमेश फायनान्सचे मनोज भालेराव आणि केबल व्यावसायिक सुनील ननावरे उपस्थित होते. भक्ती प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित या अंकात दरवर्षीप्रमाणे विविध विषयांवर सखोल माहितीपर लेखन करण्यात आले आहे.
यंदाच्या अंकात वैवाहिक समस्या, पूजापाठाचे महत्त्व, उच्च शिक्षण आणि योग, पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीकडे वाटचाल, नक्षत्रांचा अभ्यास अशा विषयांवरील लेखांसोबतच बिहार विधानसभा निवडणूक, गांधी घराणे व काँग्रेसचे भविष्य, डोनाल्ड ट्रंप यांच्या डावपेचांचा परिणाम अशा राजकीय व जागतिक घडामोडींवरही अभ्यासपूर्ण विवेचन आहे.
“भविष्य” दिवाळी अंकातून मिळणारे उत्पन्न दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मदतीसाठी वापरले जाते. मात्र यंदा राज्यावर अस्मानी पावसाचे संकट ओढावल्याने सामाजिक जबाबदारी म्हणून या अंकातून होणारे उत्पन्न मुख्यमंत्री मदत निधीत जमा करून पूरग्रस्तांना दिले जाणार आहे, अशी माहिती संपादक स्वामी विजयकुमार यांनी दिली.