मुंबई(रमेश औताडे) : बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्रातील सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांचा विराट मोर्चा मुंबईत काढण्यात येणार आहे. हा मोर्चा १४ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता भायखळा जिजामाता उद्यानातून निघून आझाद मैदानावर जाहीर सभेत परिवर्तित होईल.
शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या बैठकीत रिपाई नेते अर्जुन डांगळे, अविनाश महातेकर, राजू वाघचौरे, गंगाराम इंडिसे, गौतम सोनवणे, सुरेश माने आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
नेत्यांनी सांगितले की, महाबोधी महाविहार हे जागतिक वारसा स्थळ असूनही १९४९ च्या कायद्यानुसार त्याचे व्यवस्थापन बौद्धांऐवजी इतरांच्या हाती आहे. हा बौद्ध समाजावर अन्याय असून, केंद्र व बिहार सरकारने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चात राज्यभरातून बौद्ध समाज, विविध संघटना आणि बौद्ध भिक्खू मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, १ ते २ लाखांचा जनसमुदाय अपेक्षित आहे.