प्रतिनिधी : ताणतणावपूर्ण कामाचे वातावरण, संगणकासमोर दीर्घकाळ बसून काम, अपुरी झोप आणि असंतुलित आहार यांचा आयटी क्षेत्रातील तरुण कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. मागील काही वर्षांतील विविध अहवालानुसार, देशभरातील आयटी कर्मचाऱ्यांमध्ये हृदयविकाराचे रुग्ण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.
विशेषतः महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आयटी हब असलेल्या पुणे व बंगळुरू येथे तरुण वयोगटात हृदयविकाराच्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. २०१८ मध्ये आयटी कर्मचाऱ्यांमधील हृदयविकाराचे प्रमाण ७ टक्के होते, ते २०२२ मध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त झाले. गेल्या पाच वर्षांत आयटी क्षेत्राशी संबंधित हृदयविकार रुग्णांची संख्या ६० टक्क्यांनी वाढली आहे. ३० ते ४५ वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांच्या आकस्मिक रुग्णप्रवेशाचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे.
हृदयरोग तज्ज्ञांच्या मते, सतत १० ते १२ तास संगणकासमोर बसून काम करणे, फास्ट फूडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव आणि अपुरी झोप यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह व कोलेस्टेरॉल वाढतो. हे घटक हृदयविकाराचे मुख्य कारण ठरतात. तरुण पिढीने जीवनशैलीत बदल करून नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि पुरेशी झोप यावर भर दिल्यास या धोक्यापासून बचाव होऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.