मुंबई : महिला व लघुउद्योजकांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या भव्य ग्राहक पेठेचे उद्घाटन आज (२६ सप्टेंबर २०२५) रोजी दादर (प.) येथील वनिता समाज हॉलमध्ये संपन्न झाले. या प्रदर्शनाचे उद्घाटन ‘श्यामची आई’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाच्या निर्माती मा. अमृता राव यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
संयोजिका मीनल मोहाडीकर यांनी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम आयोजित केला आहे. तीन दिवस चालणाऱ्या या ग्राहक पेठेत सकाळी ११ ते रात्री ९ या वेळेत विविध गृहोपयोगी व आकर्षक वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
या प्रदर्शनात साड्या, पैठणी, पंजाबी ड्रेस, गाऊन्स, ज्वेलरी, बॅग्ज, पर्सेस, चादरी, पापड, ड्रायफ्रुट्स, सौंदर्य प्रसाधने, साबण, प्रायपावडर, भेटवस्तू, रांगोळी साहित्य आदी वस्तूंचा समावेश आहे.
२६ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत सुरू असलेली ही भव्य ग्राहक पेठ २८ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुली राहणार आहे.
यावेळी संयोजिका मीनल मोहाडीकर म्हणाल्या की, “या ग्राहक पेठेतून महिला व लघुउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल. ग्राहकांनी नवरात्री सणाच्या खरेदीचा आनंद घेत, उद्योजिकांना पाठबळ द्यावे,” असे आवाहन त्यांनी केले.