Tuesday, October 14, 2025
घरमहाराष्ट्र'एक दिन, एक साथ, एक तास' स्वच्छता मोहीम; नवी मुंबईत लाखोच्या हाताने...

‘एक दिन, एक साथ, एक तास’ स्वच्छता मोहीम; नवी मुंबईत लाखोच्या हाताने स्वच्छता मोहीम यशस्वी

प्रतिनिधी : ‘स्वच्छ भारत मिशन’च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आज 25 सप्टेंबर रोजी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक दिवस, एक साथ, एक तास’ ही सखोल स्वच्छता विशेष मोहीम महानगरपालिकेच्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रात ठिकठिकाणी लोकसहभागातून भव्यतम स्वरूपात राबविण्यात आली. यामध्ये दोन लाखाहून अधिक शालेय व महाविदयालयीन विदयार्थी तसेच 25 हजाराहून अधिक स्वच्छताप्रेमी नागरिक, अधिकारी, कर्मचारी यांनी एकात्म भावनेने सहभागी होत ही मोहीम यशस्वी केली. या माध्यमातून नवी मुंबई स्वच्छतेची व्यापक चळवळ उभी राहिल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे नवी मुंबईकर लहानथोर नागरिक शहर स्वच्छतेविषयी किती जागरुक आहेत याचे मूर्तीमंत दर्शन नवी मुंबईतील अनेक ठिकाणी पहायला मिळाले.

पारसिक हिल, सीबीडी बेलापूर येथे अपोलो हॉस्पिटलपासून टेकडीच्या माथ्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व डॉ.राहुल गेठे, शहर अभियंता श्री.शिरीष आरदवाड, प्रशासन विभागाचे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे, परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 चे उपआयुक्त श्री.संजय शिंदे, वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रशांत जवादे, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या उपआयुक्त श्रीम.ललिता बाबर, क्रीडा विभागाच्या उपआयुक्त श्रीम.अभिलाषा म्हात्रे, इटीसी केंद्र संचालक श्रीम. अनुराधा बाबर, बेलापूर विभागाचे सहा.आयुक्त डॉ.अमोल पालवे तसेच इतर अधिकारी, कर्मचारी, स्वच्छताकर्मी आणि विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, मॉर्निंग वॉकर्स, स्वच्छताप्रेमी नागरिक, विविध महाविद्यालयांचे एनएसएस विद्यार्थी अशा 750 हून अधिक नागरिकांनी उत्साहाने सहभागी होत पारसिक हील परिसराची स्वच्छता करीत ही मोहीम यशस्वी केली. यावेळी स्टर्लिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि व्यसनमुक्ती याविषयी फ्लॅशमॉब व पथनाट्य सादर केले.

आठही विभाग कार्यालय क्षेत्रात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या मोहिमांमध्ये तेथील सहा.आयुक्त तसेच स्वच्छता अधिकारी आणि विभागातील अधिकारी कर्मचारी, स्वच्छताकर्मी व स्वच्छताप्रेमी नागरिक यांनी 10 हजाराहून अधिक संख्येने सहभागी होत स्वच्छतेसाठी श्रमदान केले.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या 80 व खाजगी 300 हून अधिक शाळांतील 2 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी शिक्षण विभागाच्या उपआयुक्त्‍ श्रीम. संघरत्ना खिल्लारे यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग होत नवी मुंबईचे भविष्य असलेल्या विदयार्थ्यांमार्फत स्वच्छतेचा जागर केला.

त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेची 5 रुग्णालये, 26 नागरी आरोग्य केंद्रे आणि 50 हून अधिक खाजगी रुग्णालये या ठिकाणी तेथील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ आणि स्वच्छताकर्मी अशा 5000 हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

त्यासोबतच नवी मुंबई शहरातील मार्केट, कार्यालये, उद्योगसमुह, विविध संस्था, सोसायट्या अशा विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात लोकसहभागातून स्वच्छता मोहिमा राबविण्यात आल्या.

स्वच्छता ही सेवा अभियानामध्ये 17 सप्टेंबर पासून 2 ऑक्टोबरपर्यंत दररोज स्वच्छता विषयक विविध उपक्रम राबविण्याचे कॅलेंडर महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केले असून त्याची लोकसहभागातून प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. अभियानाचाच एक भाग म्हणून राबविण्यात येणा-या ‘एक दिवस, एक साथ, एक तास’ या विशेष स्वच्छता मोहीमेत नवी मुंबईकर नागरिकांनी महापालिकेसोबत एकत्र येत सकाळी 1 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करावे या आवाहनाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला, त्यामुळे संपूर्ण महापालिका क्षेत्रात स्वच्छतेची चळवळ उभी राहिल्याचे चित्र आज ठिकठिकाणी अनुभवायला मिळाले.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments