प्रतिनिधी : महिलांचे आरोग्य आणि सक्षमीकरण हे कुटुंबांच्या, समाजाच्या तसेच संपूर्ण देशाच्या प्रगतीसाठी केंद्रस्थानी आहे. त्या अनुषंगाने दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” हे अभियान महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या वतीने प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकारतर्फे साजरा करण्यात येणा-या पोषण महिन्याशी हे अभियान जुळवून राबविण्यात येत आहे.
‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालय याठिकाणी व्यसनमुक्तीवर आधारित पथनाट्य सादर करण्यात आले. अन्वय व्यसनमुक्ती केंद्र, मराठी साहित्य संस्कृती आणि कला मंडळ तसेच नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पथनाट्य स्पर्धेतील विजेते कलापथक काळसेकर कॉलेज, पनवेल यांनी अत्यंत प्रभावीपणे पथनाट्य सादर केले. याप्रसंगी 150 हून अधिक रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच लाभार्थी उपस्थित होते. पथनाट्यानंतर उपस्थित लाभार्थ्यांना नशामुक्ती संदर्भात पत्रके वाटण्यात आली.
अभियानांतर्गत नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात 5 रुग्णालये व 26 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दररोज सामान्य आरोग्य तपासणी करण्यात येत असून त्यामध्ये प्राधान्याने महिला व बालकांचा समावेश आहे. त्यासोबतच नियोजित वेळापत्रकानुसार विशिष्ट तज्ज्ञ सेवा आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. अभियानांतर्गत आत्तापर्यंत 249 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये 26052 महिला व 20842 पुरूष अशा एकूण 46901 लाभार्थ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना विविध तज्ज्ञांच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.