मुंबई(भीमराव धुळप) : महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवा राजकीय पर्याय उभा राहत असल्याची घोषणा सनय छत्रपती शासन पक्षाने केली आहे. येणाऱ्या सर्व निवडणुकांत पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मुंबई प्रेस क्लबमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. नामदेवराव जाधव यांनी सांगितले की, “महाराष्ट्राला आज पारदर्शक, जनाभिमुख आणि प्रामाणिक राजकारणाची गरज आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर आधारित लोकशाही व जनाधारित शासन व्यवस्था निर्माण करण्यासाठी आलो आहोत. सत्ता ही आमचा उद्देश नसून समाजहित हेच आमचे ध्येय आहे.”
यावेळी बोलताना राष्ट्रीय महासचिव पायस वसंत पुलिनकोटे यांनीही ठाम शब्दांत मांडणी केली. ते म्हणाले, “आम्ही अशा नेतृत्वाची जडणघडण करू इच्छितो जे खऱ्या अर्थाने जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करेल. महाराष्ट्राच्या राजकीय पटावर लोकाभिमुख व पारदर्शक पर्याय निर्माण करणे ही आमची वचनबद्धता आहे.”
पक्षाने स्पष्ट केले आहे की, तो थेट ग्रामपातळीवर जाऊन जनतेशी संवाद साधणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा किंवा लोकसभा – प्रत्येक स्तरावर पक्षाचे उमेदवार जनतेच्या न्यायासाठी लढतील, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
शेवटी जनतेला आवाहन करताना पक्षाने सांगितले की, “सनय छत्रपती शासन पक्षाला बहुमताने साथ द्या, जेणेकरून महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त आणि खऱ्या अर्थाने पारदर्शक शासन मिळेल.”