मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्य शासनातील विविध विभागांच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख योजना आणि उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. स्वतः आधी जनतेचा विचार करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या वाढदिवसाची अनोखी भेट देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून हे उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. आज ‘ स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाल्यानंतर पार पडलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानिमित्ताने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या या उपक्रमांची माहिती दिली.
यात प्रामुख्याने राज्याच्या रोजगार हमी मंत्रालयाच्या माध्यमातून ११०० कोटी रुपये खर्चून ३० जिल्ह्यात ५ हजार १०६ किलोमीटर पाणंद रस्ते तयार करण्यात येणार आहेत. आजपासून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून राज्यातील ३९४ नगर परिषदा आणि नगर पंचायतींना प्रत्येकी १ कोटींचा निधी देण्यात येणार असून त्या माध्यमातून नमो उद्यान विकसित केली जाणार आहेत. या सर्व नगर पंचायतीमध्ये स्पर्धा घेण्यात येणार असून सर्वोत्तमरित्या विकसित केलेल्या तीन उद्यानांना बक्षीस देण्यात येणार आहे.
शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून तसेच राज्यातील ७५० जिल्हा परिषद शाळा या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येतील. यात स्मार्ट वर्ग, विज्ञान
प्रयोगशाळा, संगणक प्रयोगशाळा, वाचनालय, क्रीडा सुविधा, अत्याधुनिक डिजिटल साधने यांचा समावेश असेल.
तसेच जिल्हा आणि तालुका स्तरावर चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्र प्रथम, आत्मनिर्भर भारत, ऑपरेशन सिन्दुर आणि पर्यावरण या विषयावर विद्यार्थ्यांना चित्र काढण्यास सांगण्यात येईल.
आरोग्य विभागाच्या माध्यमातून २० विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून त्याअंतर्गत
७५ आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिरे आयोजित करणे.
७५ असंसर्गजन्य रोग तपासणी शिबिरे ( मधुमेह, रक्तदाब, कर्करोग, हृदयरोग )
७५ मोफत चष्मा वाटप नेत्र तपासणी शिबिरे
७५ दंत तपासणी शिबिरे
७५ माता आणि बाल आरोग्य शिबिरे
७५ आयुष आणि योग शिबिरे
७५ क्षयरोग तपासणी शिबिरे
७५ रक्तदान शिबिरे
७५ अवयव प्रतिज्ञा शिबिरे
७५ रुग्णवाहिका वाटप करण्यात येणार आहे.
जलसंधारण विभागामार्फत पाणलोट विकास २.० योजनेअंतर्गत
७५ गावामध्ये नाला खोलीकरण
३० जिल्ह्यातील ७५०० शेतकऱ्यांना ३७.५० कोटी किमतीची शेती अवजारे आणि यंत्र वाटप करण्यात येणार आहे.
उद्योग विभागाकडून
नमो अभियांत्रिकी कौशल्य केंद्र
नमो ऑटोमोबाईल कौशल्य केंद्र
नमो वस्त्रोद्योग कौशल्य केंद्र
नमो सॉफ्ट स्कील कौशल्य विकास केंद्र
नमो कृषीउद्योग कौशल्य केंद्राना सुरुवात करण्यात येणार आहे. या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ तयार करण्यात येणार आहे.
परिवहन विभागाकडून राज्यातील ७५ एसटी स्थानकांवर मोफत वाचनासाठी वाचन कट्टा सुरू करण्यात येईल.
मराठी भाषा विभागाकडून नमो मराठी वैश्विक संपर्क समन्वय अभियान हाती घेण्यात येईल. या अंतर्गत आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची संख्या ५० देशांपर्यंत वाढवण्यात येईल.
मराठी भाषा संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यात येईल.
प्रदेशातील मराठी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी चर्चा आणि संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल.
आजवर एकही दिवस सुट्टी न घेता काम करणारे सतत कृतिशील असलेले पंतप्रधान, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख आहे. त्यामुळे त्याचा ७५ वा वाढदिवस हा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यात बदल घडवणारा आणि विकसित भारताचे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याला बळ देणारा ठरावा यासाठी शासनाच्या विविध विभागामार्फत हे निर्णय घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले.