मुंबई : गणपती विसर्जनाचं वार्तांकन करणार्या साम टिव्हीचे पत्रकार विकास मिरगणे यांना पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांनी केलेल्या मारहाणीविरोधात पत्रकार अभिव्यक्ती संरक्षण मंचच्यावतीने आज मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची सर्व पत्रकार संघटनांनी भेट धेतली. यावेळी विकास मिरगणेंना मारहाण करणार्या पोलीस निरीक्षक नाईक यांची डीसीपीकडून विभागाअंतर्गत चौकशी करू, असा शब्द आयुक्त भारती यांनी दिला.
मिरगणे यांना पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा निषेध राज्यभर सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम नाईक यांच्यावर तातडीची कारवाई करावी याच मागणीसाठी पत्रकार संघटनांच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली.
घडलेल्या घटनेबाबत मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिलगिरी व्यक्त केली. पत्रकार आणि पोलिसांचे नाते नेहमीच सलोखाचे असले पाहिजे तसेच शांताराम नाईक यांच्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यापुढे पोलिसांनी असं वागू नये यासंदर्भात सूचना पोलिसांच्या बैठकीमध्ये दिल्या जातील, असेही भारती यावेळी म्हणाले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत, पत्रकार विकास मिरगणे आणि क्राईम रिपोर्टर असोसिएशनचे उपाध्यक्ष मनिषकुमार पाठक, शाहीद अन्सारी यांचा या शिष्टमंडळामध्ये सहभाग होता.
पत्रकार विकास मिरगणेंना मारहाण करणार्या पोलीस अधिकार्याची चौकशी होणार मुंबई पोलीस आयुक्तांचा पत्रकार संघटनांना शब्द
RELATED ARTICLES