स
ातारा(अजित जगताप ) : जगाला शांततेचा संदेश देणारे महामानव भगवान गौतम बुद्ध यांचे जन्मस्थान असलेल्या बिहार येथील बुद्धगया विहार मनुवाद्यांच्या अतिक्रमणामध्ये मोकळा श्वास घेऊ शकत नाही. जागतिक दर्जाच्या या धार्मिक स्थळ बुद्धगया विहार मुक्तीसाठी सातारा जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि वंचित बहुजन आघाडी व भारत मुक्ती मोर्चा, रिपब्लिकन पक्षाच्यावतीने
साताऱ्यात भव्य मोर्चा व निदर्शने करण्यात आले.
संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने व भगवान गौतम बुद्ध की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विजय असो या जयघोषात हा मोर्चा शांततेने काढण्यात आला. होश मे आओ. बिहार मुख्यमंत्री नितीश कुमार होश मे आओ.. अशा घोषणा देत बुद्धगया बुद्ध विहार हे बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे. या मागणीसाठी दलित बांधवांनी एकजुटीने मोर्चात सामील होऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. आपल्या मागण्यांचे निवेदन सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले . मोर्चात समता सैनिक दलाचे सैनिक, युवक कार्यकर्ते तसेच जेष्ठ कार्यकर्ते आणि बौद्ध उपासक उपासिका मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या.
बौद्ध समाज बांधवांनी सकाळी दहा वाजल्यापासूनच सातारा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नजीक जमण्यास सुरुवात केली. समता सैनिक दलाच्या सैनिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देत मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चा कमानी हौद, देवी चौक, मोती चौक, गोलबागेला वळसा मारुन शनिवार पेठ पाचशे एक पाटी, पोलीस मुख्यालय मार्गे पोवई नाका येथे शिवतीर्थावर पोहोचली. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचला. तेथे सभेत रुपांतर झाले. या मोर्चात थोर साहित्यिक प्राध्यापक पार्थ पोळके, रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड, अशोक भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गणेश भिसे, संदीप कांबळे, मिलिंद कांबळे, प्रकाश फरांदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे चंद्रकांत खंडाईत, अरुण पोळ, अमोल गंगावणे, गणेश कारंडे, गुणरत्न मावळा संदीप जाधव, ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हाध्यक्ष आदित्यराव गायकवाड, रवींद्र जगताप, अमर गायकवाड ,मधुकर आठवले, अरुण पवार, गौतम भोसले, बी.एल. माने, पत्रकार अनिल वीर, विशाल भोसले, अक्षय भोसले, अनिल जगताप, अशोक बैले, सिद्धार्थ कांबळे, अशोक जगताप, रमेश गायकवाड, डॉ. मीना इंजे, वंदना कांबळे, सुशीला माने, निकिता पवार, रोहिणी सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चामध्ये ज्येष्ठ नागरिक संघटना, महिलांचाही सहभाग होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मान्यवरांची भाषणे झाली.
सातारा जिल्ह्यातील जावळी महाबळेश्वर, खंडाळा, वाई, सातारा, कराड, खटाव, कोरेगाव, पाटण, फलटण शहर व तालुक्यातून मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी उपस्थित होते.
_____________________________
फोटो– बुद्धगया मुक्ती साठी साताऱ्यात आंबेडकर अनुयायांचा मोर्चा (छाया– निनाद जगताप, सातारा)