मुंबई (शांताराम गुडेकर) : लांजा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पूर्ण प्राथमिक शाळा माचाळ, या शाळेत अलिकडेच कवी अशोक लोटणकर यांच्या ‘आभाळाचे घर’ ‘धमाल गंमत’ आणि ‘शब्दांचे फटाके’ या बालकविता आणि बालकथा संग्रह पुस्तकांचे वाटप करण्यात आले. सदर पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रफुल्ल पट्टेबहादूर, शिक्षक सचिन नागरगोजे, निवृत्त शिक्षक मधु आठल्ये सर, महसूल विभागातील निवृत्त मंडल अधिकारी सुरेश गांधी, कोकण उत्कर्ष फाऊंडेशन चे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ठाकर, सौ.स्मिता लोटणकर, तसेच माचाळचे गावकर पाडुरंग धोंडू पाटील आणि इतर वयोवृद्ध ग्रामस्य बालवाडीतील मुले इतर उपस्थित होते.या वेळी सर्व पाहुण्यांनी आपले मौलिक विचार मुलांसमोर मांडले.
मधु आठल्ये सरांनी मुलांना पुस्तकाची आवड, वाचन चिंतन आणि खेळ यावर मुलांना समजेल अशा सोप्या भाषेत सांगितले. तसेच माचाळ हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होत असल्याने, त्याचे सौंदर्य जपण्यासाठी आणि जुनी संस्कृती टिकवण्या साठी ग्रामस्थांना आवाहन केले. माचाळच्या सुंदर निसर्गाच्या सानिध्यान कवी लोटणकर यांनी ‘पाऊस’ या विषयावरील कविताचे वाचन केले; आणि मुलांनी मोठ्या आवाजात कविता म्हणत परिसर दणाणून टाकला. कवितांचा जागर केला. सुरेश गांधी आणि रवींद्र ठाकर यांनी पुस्तकांचे महत्व पटवून दिले आणि यापुढेही नवनवीन पुस्तकं शाळेला देण्याचे आश्वासन दिले. या वेळी सौ. स्मिता लोटणकर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले.
कवी लोटणकर यांची २१ पुस्तके प्रकाशित झालेली असून ते ‘डेपो मॅनेजर’ या पदावरून निवृत्त झालेले आहेत. ते मूळचे साखरपा या गावचे आहेत त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आलेले आहे. ग्रामीण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिले आहेत. नागरगोजे सरांनी आपल्या सुंदर शैलीन सूत्रसंचालन करून सर्वांचे आभार मानले.
‘माचाळ च्या अतिदुर्गम शाळेत कवी अशोक लोटणकर यांच्या पुस्तकांचे वाटप आणि कवितांचा जागर
RELATED ARTICLES