सातारा(अजित जगताप) : कोल्हापूर येथील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने मानकाई माता नवरात्र उत्सवानिमित्त ज्योत काढण्यात आलेली आहे. भक्तांनी अनवाणी पायाने ही ज्योत काढली आहे. शूरवीर महाराणा प्रताप मित्र मंडळाचे रजपूत घराण्यातील भक्तांच्या उत्साहाने प्रेरणादायी ज्योत यात्रा साताऱ्याला पोहोचली आहे.
छत्रपती शाहू महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर येथून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या सातारा येथे या ज्योतीचे पुणे बेंगलोर महामार्गावर आगमन झाले. तिथून पुढे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रेलगाव वाडी तालुका सिल्लोड या ठिकाणी ही मानकाई माता ज्योत मोठ्या भक्ती भावाने पोहोचवली जाणार आहे. या ज्योत यात्रेसाठी रजपूत घराण्यातील अनेक कार्यकर्ते सामील झालेले आहेत. मानकाई माता की जय असा जयघोष करत ही ज्योत निघाली आहे. दर दिवशी १२० किलोमीटर अंतर अनवाणी पायाने प्रवास करून आगेकूच करत आहे. कोल्हापूर ते रेलगाव वाडी हे ७५० किलोमीटरचे अंतर आहे. संपूर्ण एक आठवडाभर ज्योत यात्रा प्रवास करून सोमवार दिनांक २२ सप्टेंबर रोजी सकाळी नवरात्र आरंभ घटस्थापना दिवशी या ज्योतीचे रेलगाव वाडी येथे पूजन केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गावर सातारा हद्दीमध्ये वाढे फाटा या ठिकाणी काही काळासाठी मानकाई माता ज्योत विसावली होती. सातारा हद्दीतच शिरवळ या ठिकाणी पहिला मुक्काम केला जाणार आहे. त्यानंतर विविध ठिकाणी मानकाई माता ज्योत दर्शनासाठी थांबणार आहे. या ज्योत यात्रेसाठी तरुण पिढी भक्तिभावाने सहभागी झालेले आहेत. हे ज्योतीचे दुसरे वर्ष असून अनवाणी पायाने हे ज्योत घेऊन जाण्याचा संकल्प करत आहे. अंबा माता की जय, मानकाई माता की जय, लक्ष्मी माता की जय असा जयघोष करण्यात येत आहे.
___________________
फोटो– कोल्हापूर येथील महाराणा प्रताप मित्र मंडळाच्या वतीने मानकाई माता ज्योत यात्रा.. (छाया– अजित जगताप सातारा)