प्रतिनिधी : मुंबई पोलिसांना आता स्वतःच्या शहरातच सुमारे ५०० चौ. फु.ची मोठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गंभीर प्रयत्न करत असून याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी केली. जन सहयोग प्रतिष्ठानतर्फे शालांत परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
२०१६ पासून या संस्थेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांना टॅब, लॅपटॉप, रोख रक्कम व भेटवस्तू देऊन गौरव केला जातो. पोलिस दलातील शेवटच्या माणसाचेही महत्व अधोरेखित करत आयुक्त भारती दीड तास समारंभात उपस्थित राहिले. विद्यार्थ्यांच्या यशामध्ये माता-भगिनींचा मोलाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगून अभ्यासावरील फोकस कायम ठेवण्याचा सल्ला दिला.
पोलिसांच्या मुलांमधील क्रीडा गुणांना चालना देण्यासाठी ऑलिम्पिक दर्जाचे क्रीडा संकुल व तरण तलाव उभारण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यालयात पोलीस मुलगा महत्वाचे पद भूषवीत असल्याचा उल्लेख त्यांनी विशेष अभिमानाने केला.
या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त अभिनव देशमुख व धनंजय कुलकर्णी उपस्थित होते.
