Saturday, September 13, 2025
घरमहाराष्ट्रग्रामरोजगार सहाय्यकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन – १५ सप्टेंबरपासून कराड तालुक्यात सुरुवात

ग्रामरोजगार सहाय्यकांचे राज्यव्यापी काम बंद आंदोलन – १५ सप्टेंबरपासून कराड तालुक्यात सुरुवात

कराड(प्रताप भणगे) : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) गावपातळीवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना अद्याप योग्य मानधन आणि सुविधा मिळाल्या नाहीत. महाराष्ट्र शासनाने ३ ऑक्टोबर २०२४ रोजी ग्रामरोजगार सहाय्यकांना मासिक ₹८,००० मानधन, प्रवास भत्ता, प्रोत्साहन भत्ता आणि इतर सुविधा देण्याबाबत परिपत्रक जरी केले होते; परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप न झाल्याने ग्रामरोजगार सहाय्यक आर्थिक संकटात सापडले आहेत.

यामुळे महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सहाय्यक विकास संघटनेच्या वतीने दिनांक १५ सप्टेंबर २०२५ पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. कराड तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार सहाय्यकांनी यासंदर्भात तहसील कार्यालयात निवेदन सादर केले. कराड तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांना हे निवेदन देण्यात आले.

निवेदनात पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत –

✔ ग्रामरोजगार सहाय्यकांना पूर्णवेळ शासन सेवेत समाविष्ट करावे

✔ स्वतंत्र वेतनश्रेणी लागू करावी

✔ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही स्वतंत्र यंत्रणा म्हणून मान्यता मिळावी

✔ ३ ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर झालेल्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी

✔ ग्रामरोजगार सहाय्यकांना विमा कवच उपलब्ध करून द्यावे

संघटनेने स्पष्ट केले की, “गावपातळीवर उत्कृष्ट काम करूनही आर्थिक असुरक्षिततेत काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना शासनाने योग्य मान्यता व सुविधा द्याव्यात. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.”

कराड तालुक्यातील ग्रामरोजगार सहाय्यकांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शासनाने तातडीने निर्णय घेण्याची मागणी जोर धरत आहे.

RELATED ARTICLES

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular

Recent Comments