प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य सहकार फेडरेशनच्या टेंडर प्रक्रियेवरून गंभीर वाद निर्माण झाला आहे. जयेश मोरे यांनी फेडरेशनचे जनरल मॅनेजर नितीन यादव यांच्यावर पैसे मागितल्याचा आरोप करत पत्रकार परिषद घेतल्यानंतर प्रकरण अधिकच गाजू लागले आहे. मात्र, नितीन यादव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत “पुरावे असतील तर सादर करावेत, आरोप खरे ठरल्यास राजीनामा द्यायला तयार आहे” अशी ठाम भूमिका मांडली.
निविदा प्रक्रियेबाबत माहिती देताना यादव म्हणाले की, “जयेश मोरे यांनी आमच्याकडे टेंडर भरले होते. मात्र त्यांच्यासोबत आणखी दोन कंपन्यांनीही निविदा सादर केल्या होत्या. त्या तिन्ही कंपन्यांच्या दरांमध्ये तफावत होती. फेडरेशनला जास्त फायदा होईल अशा कंपनीला काम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मोरे यांना आम्ही फेडरेशन चे एम डी डुबे यांच्या समोर चर्चा करण्यासाठी उभे केले असता मोरे यांनी वाटाघाटी केल्या नाहीत असे यादव यांनी सांगितले असता मोरे म्हणाले मला कोणासमोरही उभे केले नाही. यादव खोटे बोलत आहेत.
पत्रकारांनी यादव यांना विचारले की, मोरे यांनी तुमच्यावर पैसे मागितल्याचा आरोप केला आहे, त्यावर काय म्हणता?” असा सवाल उपस्थित केला असता यादव यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले, “तो आरोप सिद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे पुरावे असल्यास ते सादर करावेत. जर खरेच माझ्याकडून पैसे मागण्यात आले असल्याचे सिद्ध झाले तर मी तत्काळ राजीनामा द्यायला तयार आहे.
माझा भाऊ जे काही अधिकृत व्यवसाय करत आहे त्याबाबत जयेश मोरे यांनी माझ्या भावाच्या बोगस कंपन्या आहेत.असा आरोप केला आहे.हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. माझ्या भावाचे आय टी रिटर्न चेक करा. त्याची वार्षिक उलाढाल चेक करा. सर्व अधिकृत असून भावाच्या व्यवसायाशी माझा संबंध जोडणाऱ्या मोरे यांच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई व अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याच्या तयारीत आहोत.
या वक्तव्यामुळे फेडरेशनमधील टेंडर प्रक्रिया आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकीकडे मोरे यांनी लाच मागितल्याचा थेट आरोप करत वातावरण तापवले आहे, तर दुसरीकडे यादव यांनी आव्हानात्मक पवित्रा घेत, आरोप सिद्ध करा असे परखड उत्तर दिल्याने प्रकरण चांगलेच चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.