तळमावले/वार्ताहर : पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांनी ‘एक अक्षरगणेशा संमेलनासाठी’ उपक्रम राबवला असून या उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण सिक्कीमचे माजी राज्यपाल व माजी खा.श्रीनिवास पाटील यांनी नुकतेच केले. याप्रसंगी संदीप डाकवे यांच्यासमवेत प्रथमेश डाकवे उपस्थित होते. खा.पाटील यांनी डाकवेंच्या ‘एक अक्षरगणेशा संमेलनासाठी’ या उपक्रमाचे कौतुक केले. या छोटेखानी पोस्टर प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी दादासाहेब नांगरे यांचे विशेष सहकार्य लाभले.
साताऱ्यात तब्बल 32 वर्षानंतर 99 वे साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन ‘न भूतो भविष्यती’ करण्याचा चंग सातारकरांनी मांडला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपूरी शाखा, मावळा फौंडेशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी व शिष्ट मंडळाने संमेलनासाठी आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून डाकवे यांनी ‘एक अक्षरगणेशा संमेलनासाठी’ उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी संदीप डाकवे यांच्याकडून आपल्या आवडीच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून घ्यायचा त्या बदल्यात त्यांना रु.99 किंवा त्या पटीत मूल्य द्यायचे आहे. हे मूल्य सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी देण्यात येणार आहे. यामुळे आपणास अक्षरगणेशा मिळेलच परंतू संमेलनात खारीचा वाटा उचलण्याचे समाधानही मिळेल.
विक्रांत केसरकर (वसई), सौ.अलका ढवळे (कोळेवाडी), सौ.प्रतिभा खिलारे, संदीप ढाणे (फौजी) यांनी या उपक्रमात विशेष सहभाग घेतला आहे.
अक्षरगणेशाकार संदीप डाकवे यांची जन्मतारीख 9 जानेवारी, अक्षरगणेशा उपक्रमातून मदत करण्याचे त्यांचे हे 9 वे वर्ष, साताऱ्यात 99 वे साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळे अक्षरगणेशाचे मुल्य रु.99 व त्यापटीत स्वीकारत असल्याने अक्षरगणेशात 9 अंकाची कमाल दिसून येत आहे.
संदीप डाकवे हे गेली सुमारे 20 वर्षापासून अक्षरगणेशा उपक्रम राबवत आहेत. अक्षरगणेशा व कलात्मक उपक्रमांच्या माध्यमातून मंदीर जीर्णोद्धारासाठी रु.63 हजार, नाम फाऊंडेशनला रु.35 हजार, केरळ पुरग्रस्तांना रु. 21 हजार, विविध सामाजिक उपक्रमासाठी 10 हजार, अन्नदानासाठी 7 हजार 778, विद्यार्थ्याच्या फी साठी रु.6 हजार, इर्शाळवाडी आपत्तिग्रस्तांसाठी रु.5 हजार 555, ईशिता पाचुपतेला रु.5 हजार, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीजला रु.5 हजार, भैरी पाणी योजनेसाठी रु. 5 हजार, वैद्यकीय उपचारासाठी रु. 5 हजार, माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना रु.5 हजार, मुख्यमंत्री सहायता निधी कोवीड-19 ला रु.4 हजार, मुख्यमंत्री सहायता निधीस रु.3 हजार, शांताई फौंडेशनला 2 हजार 222, भारत के वीर या खात्यात रु.1 हजार, स्व.राजाराम डाकवे (तात्या) पारितोषिक रु.1 हजार (प्रतिवर्षी) अशी रोख स्वरुपात मदत केली आहे.
एक अक्षरगणेशा साहित्य संमेलनासाठी या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक. 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे अक्षरगणेशाचे मुल्य जमा करायचे आहेत. असे आवाहन अक्षरगणेशाकार शेतीमित्र संदीप डाकवे (मो.9764061633) यांनी केले आहे.
अक्षरगणेशा उपक्रमाच्या पोस्टरचे खा.श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते अनावरण
RELATED ARTICLES