सातारा(महेश कवडे) : फत्त्यापूर (ता. सातारा) गावचे सुपुत्र श्री. शिवाजी घाडगे आणि श्री. संदीप घाडगे यांची केडर सहाय्यक सचिव म्हणून आज नेमणूक करण्यात आली असून त्यांचा नेमणुकीचा आदेश प्राप्त झाला आहे. गेल्या १५ वर्षांपासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. दि. ५ ऑगस्ट २०२५ रोजी शासनदरबारी हा महत्त्वपूर्ण निर्णय संमत झाला आणि त्यानंतर जिल्हास्तरीय सचिवांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण झाले.
याअगोदर या सेवेला कोणतेही शासकीय संरक्षण किंवा सेवा हमी नव्हती. गाव आणि संस्था पातळीवर कार्यरत असलेल्या या यंत्रणेला कामाचा ताण व पद्धतीतील अडचणींना सामोरे जावे लागत होते, तरीही त्यांना न्याय मिळत नव्हता. मात्र, आपल्या तालुक्याचे वैभव आणि आदरणीय मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पुढाकाराने या सचिवांना योग्य न्याय मिळाला.
या यशाबद्दल फत्त्यापूरसह परिसरातील ग्रामस्थांनी श्री. शिवाजी घाडगे आणि श्री. संदीप घाडगे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.