प्रतिनिधी : महाराष्ट्राचे खासदार सी.पी. राधाकृष्णन यांनी देशाचे १५ वे उपराष्ट्रपती म्हणून विजय मिळवला आहे. आज झालेल्या मतदान प्रक्रियेत एकूण ७६७ खासदारांनी मतदान केले, त्यापैकी ७५२ मते वैध ठरली. एनडीएचे उमेदवार राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर विरोधक इंडिया आघाडीचे उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. राधाकृष्णन यांनी १५२ मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली.
उपराष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर राधाकृष्णन हे राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळतील. राष्ट्रपती यांच्या अनुपस्थितीत ते अस्थायी राष्ट्रपती म्हणूनही जबाबदारी पार पाडतील.
RSS शाखेतून राजकीय जीवनाला सुरुवात करणारे आणि शांत स्वभाव, सखोल अनुभव यासाठी ओळखले जाणारे राधाकृष्णन हे भारतीय जनता पक्षाचे दीर्घकालीन नेते आहेत. त्यांनी लहान वयातच भारतीय जनसंघात प्रवेश केला होता. तामिळनाडूच्या कोईम्बतूर लोकसभा मतदारसंघातून १९९८ आणि १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला. मात्र २००४, २०१२ आणि २०१९ मध्ये त्यांचा पराभव झाला. त्याशिवाय त्यांनी तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही कार्य केले आहे.
त्यांच्या निवडीमुळे भाजपला राष्ट्रीय स्तरावर एक अनुभवी आणि समतोल नेतृत्व मिळालं असून, संसदीय कामकाज अधिक प्रभावी करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. देशभरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.